Last Updated: Monday, March 12, 2012, 21:10
www.24taas.com, नागपूरगेल्या एक दशकापासून विदर्भातला अमरावती-नरखेड प्रकल्प अपूर्ण आहे. शिवाय अनेक नव्या रेल्वेमार्गाच्या मागण्याही प्रलंबित आहेत. त्यामुळे 14 मार्चला सादर होणा-या रेल्वे अर्थसंकल्पात नागपूरकरांच्या या मागण्यांना विचारात घेऊन विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होतेय.
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर.. देशाच्या मध्यभागी असलेले एक प्रमुख शहर.. राजकीय आणि पर्यटनाच्या दृष्टीने नागपूरचे महत्व आहे.
असं असूनही गेल्या दहा वर्षापासून सुरु झालेला विदर्भातला अमरावती-नरखेड प्रकल्प निम्माही पूर्ण झालेला नाही. याशिवाय अन्य काही मागण्या गेल्या काही काळापासून प्रलंबित आहेत. नागपूर-वर्धा नवीन रेल्वेमार्ग,यवतमाळ-नांदेड नवीन रेल्वेमार्ग, नागपूर-छिंदवाडा रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर, अर्थसंकल्पात घोषणा करुनही नागपूर रेल्वेस्थानकाला जागतिक दर्जाचे करण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. याशिवाय उजनी रेल्वेस्थानकावर कोचिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रकल्प अजूनही अपूर्ण आहे. तसंच नागपुरात झोनल कार्यालयाच्या स्थापनेची मागणीही करण्यात येतेय..
रेल्वेने प्रवास करणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नव्या गाड्या आणि अधिक डब्बे जोडण्याची मागणी नागपूरकरांकडून होतेय. याबाबत रेल्वे अधिका-यांनी काही बोलण्यास नकार दिलाय. त्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात नागपूरकरांच्या पदरी काय पडते की नेहमीप्रमाणे त्यांच्या तोंडाला पाने पुसली जातात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
रेल्वेकडून विदर्भाच्या अपेक्षा
- अमरावती-नरखेड प्रकल्प दहा वर्षापासून प्रलंबित
- नागपूर-वर्धा, यवतमाळ-नांदेड, रेल्वेमार्गाची मागणी प्रलंबित
- नागपूर-छिंदवाडा रेल्वेमार्गाचे नॅरोगेज ते ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याची मागणी
- नागपूरला जागतीक दर्जाचे रेल्वेस्थानक करण्याची घोषणा हवेत विरली
- उजनी रेल्वेस्थानकावर कोचिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रकल्प अपूर्ण
- विभागीय कार्यालय स्थापण्याची मागणी
First Published: Monday, March 12, 2012, 21:10