एकमेवाद्वितीय सचिन - Marathi News 24taas.com

एकमेवाद्वितीय सचिन

www.24taas.com
 
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या बॅटनं अनेक रेकॉर्ड केले आहेत. क्रितकेटमधील ही रनमशिन आपल्या करिअरच्या अत्युच्च शिखरावर आहे. आपल्य़ा क्रिकेट करिअरमध्ये त्यानं अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. 
 
 
सचिन तेंडुलकर ज्या-ज्यावेळी क्रिकेटच्या मैदानावर उतरतो त्यावेळी तो कुठला ना कुठला नविन रेकॉर्ड होतो. क्रिकेटच्या या दैवताचं गेल्या दोन दशकांपासून क्रिकेटविश्वावरच अधिराज्य कायम आहे. त्यानं शानदार बॅटिंग करत बॅटिंगमधील जवळपास सारेच रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. आपल्या क्रिकेट करिअरमध्ये त्याच्या नावावर निरनिराळे रेकॉर्डस आहेत. 
1. 1994 - अर्जुन पुरस्कार
2. 1997-98  राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
3. 1997 -विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर
4. 1999 - पद्मश्री
5. 2001-महाराष्ट्र भूषण
6. 2003 - वर्ल्ड कपमध्ये प्लेअर ऑफ द टूर्नामेंट
 7. 2005 - राजीव गांधी पुरस्कार
8. 2008 - पद्म विभूषण
9. 2009 - मादाम तुसॉंदमध्ये मेणाचा पुतळा
10. 2010 -ICC क्रिकेटर ऑफ द इयर
11. 2010 -  पीपल्स चॉईस पुरस्कार (एशियन अवॉर्ड)
12.  2010 - इंडियन एअर फोर्समध्ये  ग्रुप कॅप्टन 
 
 जबरदस्त बॅटिंगने फार थोड्या कालावधीत आपल्या भोवती वेगळ वलय निर्माण केल्यानंतर सचिनला 1994 मध्ये क्रीडा क्षेत्रातील असामन्य कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कारानं गौरविण्यात आलं. त्यानंतर 1997-98  मध्ये राजीव गांधी खेलरत्न हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार त्य़ाला मिळाला.  1997 मध्ये विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयरही तो ठरला. 1999 मध्ये त्याला पद्मश्री या भारताच्या चौथ्या सर्वोत्कृष्ट नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2001 मध्ये महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट नागरी पुरस्कार त्याला मिळाला. 2003 वर्ल्ड कपमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार त्यानं पटकावला. त्यानंतर 2005 मध्ये त्याला राजीव गांधी पुरस्कारही देण्यात आला. 2008 मध्ये पद्म विभूषण हा भारताचा दुसरा नागरी पुरस्कारानं त्याचा गौरव करण्यात आला. 2009 मध्ये मादाम तुसॉंदमध्ये त्याचा मेणाचा पुतळा तयार करण्यात आला. 2010 मध्ये ICC चा क्रिकेटर ऑफ द इयरही तो ठरला. 2010 एशियन अवॉर्ड्समध्ये पीपल्स चॉईस हा विशेष पुरस्कार त्याला मिळाला. 2010 मध्ये इंडियन एअर फोर्सनं ग्रुप कॅप्टन ही पदवी सचिनचा गौरव केला.
 
सचिनच्या करिअरमध्ये अनेक पुरस्कार पटकावले आहेत. त्यामुळेच त्याला पुरस्कारांचा अनभिष्क्त सम्राट असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही. सचिन तेंडुलकर नावाच्या हि-याला पैलू पाडण्याचं काम केलंय ते रमाकांत आचरेकर यांनी....त्यांनी बालपणीच सचिनची क्रिकेटमधील गुणवत्ता ओळखली...त्यांच्या देखरेखीखाली तयार झालेला सचिन आज क्रिकेटमधील 'मास्टर' झाला आहे.
 
मीरपूर वनडेतल्या याच बॉलकडे सा-या देशवासियांचं लक्ष लागलं होतं.. शकीब उल हसनचा बॉलवर मास्टर ब्लास्टरनं फाईन लेगला स्ट्रोक  लगावताना सचिननं सेंच्युरीचं इव्हरेस्ट सर केलं..आणि सा-या देशभरात आनंदोत्सव साजरा झाला.. गेल्या वर्षभरापासून होणार होणार याची उत्कंठा असलेली सचिनची महासेंच्युरी मीरपूर वन-डेत अशा जल्लोषात झाली.. क्रिकेटचा देव, क्रिकेटचा महाराजा, भारतीय क्रिकेटला पडलेलं गोड स्वप्न अशा किती तरी विशेषणं सचिनला लावली जातात. जमिनीवर घट्ट  पाय ठेऊन गेली 22 वर्ष भारतीय क्रिकेटची सेवा करणा-या सचिनची सेंच्युरीची 33 इनिंगची प्रतीक्षा अखेर मीरपूर वन डेत संपुष्टात आली. 114 रन्सच्या सचिनच्या झंझावाती इनिंगमध्ये 12 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता.
 
सचिनच्या या महासेंच्युरीच्या विराट कोहली आणि सुरेश रैनानं चांगली साथ दिली.. सचिनच्या या महासेंच्युरीनं त्यानं क्रिकेट जगतातलं एव्हरेस्ट सर केलय. सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी होणारी तुलना सार्थ करुन दाखवत सचिननं हा 100 सेंच्युरींजचा टप्पा पार केलाय. गेल्या वर्षभर सचिनला ही महासेंच्युरी हुलकावणी देत होती..  मात्र सचिननं या कठीण काळावर मात केली.. आणि बॅटनंच सर्व प्रश्नांना उत्तर देत तोच क्रिकेटचा बादशाह असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं.
 
क्रिकेटमधले सगळे विक्रम सचिनसाठीच आहे काय, असा प्रश्न पडावा अशा वेगानं त्यानं आपल्या 22 वर्षांच्या कामगिरीत विक्रम नोंदवले.. सचिनच्या विक्रमांच्या जवळपासही कोणी फिरकेल अशी स्थिती सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाही. केवळ भारतीय खेळपट्यांवरच नाही तर परदेशातल्या उसळत्या खेळपट्ट्यांवरही भल्याभल्या बॉलर्सची भंबेरी उडवत सचिनची बॅट तळपत राहिली. सचिननं खेळत राहावं आपण बघत रहावं असा हा आनंद सचिननं या सर्वोच्च खेळींनी सा-या देशवासियांना आणि क्रिकेटप्रेमींना दिलाय. .  सचिनच्या महासेंच्युरीनं गुढीपाढव्यापुर्वीच सेंच्युरीची गुढी उभारली गेली. आणि संपूर्ण देशात दिवाळी, पाडवा एकत्र साजरा झाला.  
 
 
 

First Published: Saturday, March 17, 2012, 02:58


comments powered by Disqus