'राज'कारण (ठाकरे) पॉवरफुल - Marathi News 24taas.com

'राज'कारण (ठाकरे) पॉवरफुल


www.24taas.com, मुंबई
 
महाराष्ट्र नव निर्माण सेनेनं महाराष्ट्राच्य़ा राजकारणात आपली वेगळं स्थान निर्माण केले आहे. महापालिकेच्या निवडणुकीत मनसेची ताकद सर्वच राजकीय पक्षांना समजली आहे. मनसे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू का ठरतोय, राज ठाकरेंची प्रत्येक खेळी का यशस्वी ठरत आहेत. मनसे राज्याच्या राजकारणाला भविष्यात कलाटणी देणार का, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेतला आहे, पॉवरफुल राजकारणात.
 
 
 

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सर्वच राजकीय पक्षांना आपल्या राजकीय शक्तीची ओळख करुन दिला आहे. नुकतेच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये मनसेनं सत्ता काबीज केली तर पुण्यात विरोधपक्ष पदाचा मान मिळवला. कोकणातील खेड नगरपरिषद आणि यवतमाळमधील वणी नगरपरिषदेमध्येही एकहाती सत्ता आहे. तर एका पंचायत समितीत निर्विवाद वर्चस्व आहे. औरंगाबादमध्येही मनसेने चांगला जम बसवला आहे. या कामगीरीमुळे मनसे राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी जाऊन पोहोचला आहे.
 
 
शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत राज ठाकरेंनी महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणाला जन्म दिला होता. या घटनेला आता सात वर्ष उलटून गेलीत. तर राज ठाकरेंची नवनिर्माण सेना नुकतेच सहा वर्षांची झालीय. पण अवघ्या सहा वर्षांत या पक्षानं महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आणि त्यामुळंच आता मनसेला टाळून राजकारण करणं कोणत्याच राजकीय पक्षाला जमणार नाही हे मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे महापालिकेच्या निवडणूकीत राज ठाकरेंनी दाखवून दिलं आहे.
 
 
नाशिकमध्ये तर मनसेनं भाजपच्या मदतीनं सत्ता मिळवलीय. तर पुणे महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून स्थान पटकावलं आहे.  महापालिकेच्या निवडणुकीनंतर मनसे राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू बनत चालला असल्याचं चित्र आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्न केला.  पण शिवसेना- भाजप युतीनं पुन्हा एकदा सत्ता खेचून आणण्यात यश मिळवलं. तिकडे ठाण्यात जादूई आकडा गाठण्यात शिवसेना- भाजप युतीची चांगलीच दमछाक झाली होती. कारण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अघाडीनेही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरु केले होते. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केल्यामुळे युतीचं धाबं दणाणलं होतं. त्यामुळेच फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला होता. धास्तावलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी राज ठाकरेंची भेट घेऊन मग पाठिंब्यासाठी विनवणी केली आणि राज ठाकरेंनी शिवसेना- भाजप य़ुतीला पाठिंबा देण्याची घोषणा करून ठाण्यातलं चित्र पालटवलं.राज ठाकरेंच्या या खेळीमुळे ठाण्यात सत्ता मिळविण्याचं काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं स्वप्न भंगलं. शिवसेनेला दिलेल्या या पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये सेना मनसेला साथ देईल अशी त्यांची अपेक्षा होती.
 
 
शिवसेनेचाच  मुखभंग


राज ठाकरेंच्या या राजकीय खेळीमुळे शिवसेना-मनसे एकत्र येणार का याची चर्चा सुरु झाली. पण ठाण्यात पाठिंबा घेणा-या उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये मात्र मनसेच्या सत्तेच अडथळे आणले.  पण राज ठाकरेंनी भाजपची मतं तर मिळवलीच, पण राष्ट्रवादीनंही तटस्थ राहून मनसेला मदत केली. मनसेला अपशकुन करणा-या शिवसेनेचाच त्यामुळे मुखभंग झाला आणि त्याचे परिणाम आता ठाण्यातही भोगावे लागतायत. कारण शिवसेनेच्या नाशिकमधल्या भूमिकेचा वचपा काढण्यासाठी मनसेनं ठाण्यातला पाठिंबा काढून घेतला, त्यामुळे आता स्थायी समितीसह अन्य महत्वाच्या पदांसाठी शिवसेनेला निकराची झुंज द्यावी लागतेय..मनसेची राजकीय घौडदौड अशीच सुरु राहिल्यास आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मनसेला टाळून कोणालाच राजकारण करता येणार नाही हे ही तेव्हडंच खरं.
 
नुकतेच पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत मनसेने एकला चालो रे चा नारा दिला होता. पण नाशिकमध्ये सत्ता मिळविण्यासाठी त्यांनी युतीतल्या भाजपलाच आपल्यासोबत घेऊन राज्यात नवं राजकीय समिकरण घडवून आणलं. तसेच पुण्यात विरोधी पक्ष नेतेपदाची खुर्ची मिळवली. या मागेचं मनसेचं मुत्सद्दी राजकारण पाहाय़ला मिळालं. राज्यात नुकत्याच पार प़डलेल्या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपली ताकद दाखवून दिली. राजकीय विश्लेषकांच्या तर्कवितर्कांना खोटं ठरवत नाशिकमध्ये  पक्षानं सत्ता काबीज केलीय, तर पुण्यातही शिवसेना- भाजपला मागे टाकत विरोधी पक्षनेत्याची खुर्ची पटकावलीय. मनसेच्या या राजकीय खेळीनं इतर राजकीय पक्षांना विचार करण्यास भाग पाडलं आहे. महापालिकेत मिळविलेल्या आपल्या राजकीय ताकदीचा योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीनं वापर करण्यात मनसे यशस्वी झाली.
 
 
 
 
मनसेची भाजपशी सलगी
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेली राज ठाकरेंची मैत्री त्यांच्या या वेळी कामाला आलीय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी राज ठाकरेंची मैत्री सर्वश्रूत आहे. नाशिकमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत ज्या प्रकारे नाट्यमयरित्य घडामोडी घडल्या त्या पहाता आगामी काळात राज ठाकरेंची राजकीय खेळी इतर पक्षांसाठी तापदायक ठरण्याची शक्यता वर्तवली जातेय. महाराष्ट्रात उदयास आलेली ही नवी राजकीय शक्ती आता राज्याच्या राजकारणात एक नवीन पॉवर सेंटर बनत चालली आहे. मनसेला केवळ महापालिकेत यश मिळालंय असं नाही तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही काही प्रमाणात यश मिळालं आहे.. त्यामुळे केवळ शहरी भागातील पक्ष अशी ओळख पुसण्यात यावेळी मनसेला यश आलं आहे. पक्षाची ताकद असलेल्या ठिकाणीचं निवडणूक लढवून ती जिंकायची अशी रणनीती मनसे अध्यक्षांनी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकींपूर्वी आखली होती. त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या मोठ्या महानगरपालिकांवर लक्ष केंद्रीत केले होते.
 
 
 


 मुंबईत त्यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं. पण मुंबईला लागून असलेल्य़ा महापालिकेत त्यांना आपेक्षित यश मिळवता आलं नाही. खरंतर त्यामागे अनेक कारणं असल्याचं बोललं जातंयं.राज ठाकरेंनी उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर ठाण्य़ातील कार्यकत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला होता... निवडणुकींपूर्वी काही प्रमाणात वाद शमवण्यात पक्षनेतृत्वाला यश आलं होतं, मात्र निवडणुकीत त्याचा फटका पक्षाला बसलाच आणि त्यांना अपेक्षित यश मिळवता आलं नाही... पुणेकरांनी मात्र मनसेला भरभरुन मतदान केलं. आणि त्यामुळेच पक्षाकडे विरोधीपक्ष पद चालत आलं. पुण्यातल्या महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेनं तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा  मार्ग आणखी सुकर झाला होता. तशीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनंही नाशिकमध्ये घेतल्यामुळे मनसेचा मार्ग सुकर झाल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. एकूणच सत्तेचा सारिपाट मांडताना योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमताही राज ठाकरेंनी दाखवून दिली. भविष्यात अशीच अचूक पावलं पडली तर सत्तेच्या राजकारणात मनसेही पुढे जाऊ शकते.

 
 
मनसेचा आजपर्यंतचा प्रवास  
महाराष्ट्र नवनिर्माण सेना.  राजकीय पटलावरचं मतदारांच्या दृष्टीने विश्वासाचं नव केद्र आणि सर्वच राजकीय पक्षांच्या प्रस्थापित वर्चस्वाला धक्का देणारा एक पक्ष हे समिकरण मराठी मतदारांवर  चांगलच आरुढ व्हायला सुरुवात झालीय. शिवसैनिकाच्या मनातला भावी सेनाप्रमुख असं ज्य़ा राज ठाकरेंबद्दल भरभरुन बोलल जायचं, त्याच राजनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि शिवसेनेतचं नव्हे तर चांद्यापासून बांद्यापर्यतच्या शिवसैनिकांमध्ये विचारांचीच दुफळी माजली. शिवसेनेला बडव्यानी घेरलयं असा आरोप करत बंडखोर राज ठाकरे यानी शिवसेनेला पर्याय म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.. पक्षाच्या सुरवातीच्या सभेपासुन  वातावरण निर्मीती करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टिकास्त्र सोडण्यास सुरुवात केली.
 
 
 
 
२००७ च्या महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्या आणि मनसेनं जोरदार हवाही निर्माण केली. पण निष्ठावंतानी मनसेला नाकारत केवळ सात जागांवर विजय मिळवून दिला.. त्यावेळी सा-यानीच मनसे संपली हो अशी हाकाटी पीटायलाही सुरुवात केली. पण संपलय संपलय अस वाटत असतानाच लोकसभेच्या निवडणुकीत मनसेनं शिवसेनेला तडाखा दिला. आणि मुंबईतून शिवसेनेच्या सर्वच जागांवर पराभवाच तोंड पाहावं लागलं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेन आपले तेरा आमदार पाठवून आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन दिली.. त्यानंतर मात्र मनसेनं हळूहळु सा-याच सत्ताकेद्रामध्ये आपला शिरकाव करायला सुरुवात केली. दोन महिन्यापुर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीतही मनसेनं आपली खाती उघडायला सुरुवात केली.. यानंतर मात्र सा-यांचच लक्ष लागलं ते मुंबई ठाण्याच्या महानगरपालिकेत मनसे काय चमत्कार करते याच्याकडे.. आणि शिवसेनेसह राष्ट्रवादीला टार्गेट करत मनसेप्रमुखानी एकहाती प्रचाराच मैदान मारायला सुरुवात केली. आणि त्याचे पडसाद या निव़डणुकीत उमटलेच.. जी मनसे गेल्या निवडणुकीत राजकीय विश्लेषकाना नगण्य वाटत होती तीच मनसे.
 
 
 
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यावेळच्या निवडणुकीत जबरदस्त कामगिरी करत पक्षाचा आलेख उंचावता नेला. २००७ मध्ये मुंबईत सात जागांवर असलेली मनसे २०१२ मध्ये २८ जागांवर पोहोचलीय. ठाण्यात तीन नगरसेवक यंदा सात झालेयत. पुण्यात मागच्या निवडणूकीत ८ जागांवर विजयी असणारी मनसे यंदा २९  जागांवर किंगमेकर बनलीय.  तर यंदा पहिल्यांदाच खात खोलंत पिंपरी चिंचवड मध्ये चार जागा, उल्हासनगरमध्ये १ आणि नागपूरमध्ये दोन जागांवर विजय मिळवलाय. तर नाशिकमध्ये सर्वच पक्षाना दणका देत मागच्या वेळचा १२आकडा यावेळेला तब्बल ४० वर गेलाय.  राज ठाकरे यानी प्रचाराची एकहाती धुरा सांभाळत निवडणूकीचा पेपर दिला. जनतेसमोर खुल्या मुलाखतीला सामोर गेलेल्या राज ठाकरेंच्या प्रगतीपुस्तकात जनतेनं उत्तम प्रगतीचा शेरा मारला. या सर्वात आता लक्ष लागलय ते,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कशी असेल पुढची वाटचाल याचच.
 
 
 
मनसेची स्थापना झाल्यानंतर ज्या निवडणूका झाल्या त्यामध्ये मनसेला मत म्हणजे काँग्रेसला मत असा प्रचार केला गेला.तसेच शिवसेनेला शह देण्यासाठी सत्ताधारी मनसेचा वापर करत असल्याचं बोललं गेलं. पण आपला मतदार वेगळा असल्याचं  मनसेनं दाखवून दिलं आहे. पण मनसेची स्थापना झाल्यानंतर मुंबई महापालिका आणि त्यानंतर विधानसभेच्या  निवडणूका झाल्या..विधानसभेच्या निवडणुकीत  मनसेनं १३ चा आकडा गाठला. या दोन्ही निवडणूकींमध्ये मनसेला मत म्हणजे काँग्रेस आघाडीला मत असा प्रचार केला गेला होता.मनसेमुळे मराठी मतांची विभागणी होईल असा दावा केला गेला होता. लोकसभेच्या निवडणूकीत मुंबईत शिवसेना- भाजप युतीला  त्याचा प्रत्यय आला. पण या काळात मनसेनं आपली वेगळी वोट बँक तयार केली आणि त्याचा फायदा पक्षाला झाला.
 
 
 
महापालिकांच्या निवडणुकीत मनसेनं डोळ्यात भरणारी कामगिरी केली आहे.मनसेनं गेल्या सहा वर्षात वेगाने हा प्रवास केला आहे...   मनसेची स्थापना झाल्यानंतर  मराठी पाट्या आणि परप्रांतियांचा मुद्दा पक्षाने हाती घेतला होता. मनसेच्या खळ्ळ फट्याक आंदोलनामुळे पक्षाला चांगलीच  प्रसिद्धी मिळाली.मनसेच्या आंदोलनाच्या काळात दोन्ही काँग्रेसकडून त्यांना राजकीय स्पेस तर दिली जात नाही ना ? अशी शंका व्यक्त केली जात गेली होती.कारण राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात होती...राज ठाकरेंच्या अटकेनंतर तर मोठं आंदोलन पेटलं होतं. राज ठाकरेंना मोठं करण्यासाठी ही खेळी केली जात असल्याचं बोललं गेलं.शिवसेनेला शह देण्यासाठी सत्ताधा-यांकडून मनसेचा वापर केला जात असल्याचा आरोप केला गेला. पण निवडणुकांमध्ये मनसेनं सत्ताधा-यांनाही त़डाखा देत आपली ताकद दाखवून दिली.त्यामुळे मनसे ही एक स्वतंत्र राजकीय शक्ती असल्याचं यातून स्पष्ट झालं.
 
 
आगामी  निवडणुकीत  किती यश मिळवणार याकडं  लक्ष 
मनसेनं महापालिका निवडणुकीत चांगली यश मिळवलं...त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे किती यश मिळवणार याकडं आता सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.मनसेची आगामी काळातील वाटचाल कशी असेल. माझ्या हाती एकदा सत्ता द्या सा-यांना सुतासारंख सरळ करतो असं  भावनिक आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं..  मुंबई - ठाण्यात शिवसेनेला, पुण्यात आघाडीला आणि नाशिकात राष्ट्रवादीला एकट्यानेच टार्गेट करत या सा-या महापालिकांमध्ये मनसेला यश मिळवून दिल.... राज्यातल्या प्रमुख महापालिकेतील मनसेचा कामगिरीही लक्षणीय अशीच म्हणावी लागेल.. यावेळेच्या निवडणुकीत मनसेनं जबरदस्त कामगिरी केली असली तरी मुंबई-ठाण्यात किंगमेकर किंवा थेट किंग बनण्यातही राज मनसेला यश आलं नाही . नाशिक आणि पुण्यात पक्षाने चांगली कामगारि केलीय..यापार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने विचार केल्यास मनसेची ताकद वाढण्याची शक्यता आहे.आजच्या घ़डीला  मनसेचे मुंबईत ६ , नाशिकमध्ये ३  , कल्याणमध्ये २ आणि कन्नडमध्ये १ अशी आमदारांची  एकून संख्या १२  आहे.
 
 
 
महापालिकेच्या निवडणूकीत यावेळेला मनसेच्या जागांमध्ये वाढ झाली असली तरी लोकसभा आणि विधानसभाच्या निकालाचे प्रमाण लक्षात घेता तुलनेनं महापालिका निकालात त्याचा प्रभाव नसल्याचं समोर येतंय. आणि हि विशेष म्हणजे ही बाब खुद्द मनसेप्रमुखानीच गांभिर्याने घेतलीय.  यावेळी मनसेनं परीक्षा घेऊन उमेदवार दिले होते  पण निकालानंतर मात्र मनसेतही बंडखोरीची लागण झाल्यचं चित्र दिसलं. राज ठाकरे यांचे नेतृत्व मानणारा कार्यकर्ता जर उमेदवारीसाठी थेट पक्षाशी गद्दारी करत असेल तर अशा बंडखोरीवर वेळीच लस देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील मनसे आमदारापैकी नितीन सरदेसाईसोडता सर्वच मनसे आमदारांची कामगिरीही साधारण राहिलीय. शिवसेनेप्रमाणे पुन्हा एकदा सर्वच वॉर्डाची झाडाझडती आणि पुनर्बांधणी करावीच लागणार आहे.आगामी विधानसभेत पक्षाने चांगली कामगिरी केल्यास    २०१४ च्या विधानसभा निवडणूरीनंतर मनसेच्या आमदारांची संख्या वाढल्याचं पहायला मिळाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.
 

First Published: Tuesday, March 20, 2012, 12:01


comments powered by Disqus