पुण्यात टँकर माफियांचे थैमान - Marathi News 24taas.com

पुण्यात टँकर माफियांचे थैमान

www.24taas.com, अरुण मेहत्रे-पुणे
 
पुण्यात पाण्याचा काळाबाजार सुरु आहे. शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर टँकरमाफिया सक्रीय झालेत. पुणे महापालिकेच्या येरवडा टँकर भरणा केंद्रातून होणा-या पाणीचोरीचा झी 24 तासनं केलेला हा पर्दाफाश.
 
पुण्यात अशाप्रकारे खुलेआम पाण्याची चोरी होतेय...हा टँकर खाजगी आहे. महापालिकेच्या येरवडा इथल्या संगणकीकृत टँकर भरणा केंद्रात तो भरला जातोय.. तो टँकर कुठे जाणाराय याचीही माहिती नाही. टँकर भरण्याची वेळ सकाळी सातपासूनची असली तरी सकाळी साडेसहालाच हा टँकर भरला जातोय. वेळेपूर्वीच हा टँकर का भरण्यात आला आणि हा टँकर कुठं गेला. याची उत्तर मिळवण्यासाठी आमच्या झी 24 तासच्या टीमनं थेट कार्यालय गाठलं. इथं मिळालेली माहिती फारच धक्कादायक होती. अधिकृत वेळेपूर्वी टँकरची कुठलीच नोंद कार्यालयात नव्हती. संगणकीकृत यंत्रणा होती, मात्र कार्डमध्ये बॅलन्स नसल्यानं बंद होती.
 
कुठल्याचं प्रश्नाचं समाधानकारक उत्तर या कर्मचा-यांकडे नव्हतं. कर्मचा-यांना चिरीमिरी चारून हा काळाबाजार केला जातोय. हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
 
शहरात पाणीपुरवठा सुरु असताना टँकर भरली जात असल्यानं नागरिकांना कमी दाबानं पाणी मिळतं. त्यात टँकरची नोंद न ठेवणं म्हणजे निव्वळ भ्रष्टाचारच. एकीकडं पुण्यात पाणीकपात सुरु आहे, नागरिक पाणीटंचाईनं त्रस्त आहेत. तर दुसरीकडं अशा पद्धतीनं पाण्याचा काळा बाजार सुरु आहे. यामागे संपूर्ण लॉबी कार्यरत असून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात येतंय.
 
महापालिकेला कदाचित या प्रकाराची कल्पना नसावी किंवा संबंधितांकडून जाणीवपूर्वक त्याकडं दुर्लक्ष केलं जात असावं. आता टँकर माफियांचा पर्दाफाश झालाय, त्यामुळं पाणीचोरांवर कारवाई झालीच पाहिजे.
 

First Published: Thursday, March 22, 2012, 20:59


comments powered by Disqus