शाळेचे मजले तयार, पण जिनेच नाहीत ! - Marathi News 24taas.com

शाळेचे मजले तयार, पण जिनेच नाहीत !

अरुण मेहेत्रे, www.24taas.com, पुणे
 
पुणे महापालिकेच्या उफराट्या कारभाराचा धक्कादायक नमुना समोर आला आहे. महापालिकेच्या एका शाळेचे मजले बांधून तयार आहेत. मात्र खालच्या मजल्यावरुन वरच्या मजल्यावर जाण्यासाठी आवश्यक असलेला जिनाच अजून बांधण्यात आलेला नाही. त्यामुळं शाळेच्या ७ वर्गखोल्या वापराविना पडून आहेत. तर मुलांवर व्हरांड्यात बसण्याची वेळ आलीय.
 
पुणे महापालिकेची बिबवेवाडीतील चिंतामणराव देशमुख ही प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पहिली ते चौथीच्या वर्गातील ९०० विद्यार्थी शिकतात. विद्यार्थीसंख्या जास्त आणि वर्गखोल्या कमी असल्यानं जुन्या इमारतीवर नवीन दोन मजले चढवण्यात आले. दुसऱ्या मजल्यावरील पाच आणि तिसऱ्या मजल्यावरील २ अशा ७ नवीन खोल्या शाळेसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या. मात्र या सर्व खोल्या वापराविना पडून आहेत. कारण या खोल्यांपर्यंत पोचायला जिनाच नाही.
 
इथली आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मागील ५ वर्षांपासून बांधून असलेली स्वच्छतागृहेही अजूनपर्यंत वापरात नाहीत. या स्वच्छतागृहांना आऊटलेट्सची व्यवस्था नसल्यानं ती कुलुपबंद आहेत. इथल्या समस्या तातडीनं सोडवल्या गेल्या नाहीत, तर आंदोलनाचा इशारा इथल्या नागरिकांनी दिलाय.
 
आज महापालिका शाळांची स्पर्धा खाजगी शाळांशी आहे. शहरातील लाखो गोरगरीब विद्यार्थी महापालिका शाळांतून शिकतात. या शाळांसाठी मोठ्या प्रमाणाता निधीही उपलब्ध करुन दिला जातो. असं असताना केवळ नियोजनाच्या अभावी या शाळा आणि तिथले विद्यार्थी अत्यावश्यक सुविधांपासून वंचित आहेत. महापालिका याची दखल घेणार का हा आता प्रश्न आहे.
 
 
 

First Published: Saturday, March 24, 2012, 19:04


comments powered by Disqus