कर्जालाही सोनं लागलं - Marathi News 24taas.com

कर्जालाही सोनं लागलं

www.24taas.com, मुंबई
 
 
सोनं तारण ठेवून कर्ज काढणं आता तेवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही. सोनं तारण ठेवून कर्ज देणा-या कंपन्यांसाठी रिझर्व बँकेनं नवी नियमावली जाहीर केलीये. त्यानुसार सोने खरेदीची पावती असेल अशाच ग्राहकांना कर्ज देता येणार आहे. या नियमांचा गोल्ड लोन कंपन्यांच्या कारभारावर दूरगामी परिणाम होणार आहे.
 
 
सर्वसामान्यांना सोनं तारणं ठेवून कर्ज घेणं आता आणखी अडचणीचं झालं. सोन्यावर साठ टक्क्यांपर्यंतच तारण कर्ज मिळेल हा नियम लागू करुन रिझर्व बँकेला एकच आठवडा उलटला नाही तोच रिझर्व बँकेनं आणखी एक नवी नियमावली लागू केलीये.  या नियमावलीनुसार  ज्या ग्राहकाकडं सोनं खरेदीची पावती आहे त्यालाच सोनं तारण ठेवून कर्ज मिळणार आहे. जर ग्राहक सोन्याची मालकी सिद्ध करु शकला नाही तर त्याला आता सोन्यावर तारण कर्ज मिळणार नाही.
 
 
कर्ज फेडू न शकणा-या ग्राहकांच्या सोन्याचा लिलाव करताना संबधित कंपनीला एक स्थानिक आणि राष्ट्रीय वृत्तपत्रात जाहिरात द्यावी लागणार आहे. एवढचं नव्हे तारण ठेवलेल्या सोन्याचा विमाही काढावा लागणार आहे.  या नियमांमुळं ज्यांच्याकडं पिढीजात सोनं आहे आणि ज्या लोकांची सोने खरेदीची पावती हरवलीये त्यांना सोने तारण कर्ज मिळण्याचे दरवाजे बंद झालेत. आरबीआयच्या नियमावलीमुळं गोल्ड लोन देणा-या कंपन्या अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झालीये.
 
 
गोल्ड लोन देणा-या कंपन्यांविरोधात येणा-या तक्रारी आणि अडचणी दूर करण्यासाठी रिझर्व बँकेनं ही नियमावली लागू केलीये. असं असलं तरी याचा प्रत्यक्ष फटका मात्र सर्वसामान्य जनतेला बसणार हे मात्र तितकचं खरं आहे.

First Published: Thursday, March 29, 2012, 14:55


comments powered by Disqus