मनसेची 'राज'नीती - Marathi News 24taas.com

मनसेची 'राज'नीती

www.24taas.com, मुंबई
 
मनसेच्या इंजिनचं बळ आता काँग्रेस आघाडीला मिळणार असल्यामुळे ठाणे महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणुक चुरशीची होणार आहे. मनसेच्या या खेळीमुळं काँग्रेस आघाडीने मरगळ झटकली आहे तर शिवसेना भाजप युतीची डोकेदुखी वाढली आहे.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठकरे यांच्या या भूमीकेमुळं महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. ठाणे महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या घड्याळाला मनसेच्या इंजिनची साथ मिळणार आहे. खरं तर ठाणे महापौर पदाच्या निवडणुकीत राज ठाकरेंनी शिवसेना- भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहिर केला होता. पण आता त्यांनी थेट काँग्रेस आघाडीशी जवळीक केलीय.
 
बसपाला महाराष्ट्रात मनसेच्या मदतीने मोठं करणं ही मनसेच्या दृष्टीने राजकीय घोडचूक ठरेल हे मनसेप्रमुख राज ठाकरे य़ांच्या चाणाक्ष राजकीय नजरेनं ओळखले आणि त्यांनी चक्क एनसीपी - काँग्रेस आघाडीला स्थायी समितीसाठी सपोर्ट करण्याचा निर्णय़ घेतला.
 
गुरुवारी राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानातून जितेंद्र आव्हाड बाहेर पडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सगळं काही सांगून जात होतं. ठाण्यात शिवसेना - भाजप -रिपाइं महायुतीला शह देण्यासाठी काँग्रेस आघाडीला आता मनसेच्या इंजिनची ताकद मिळाली आहे.
 
ठाणे महापालिकेत शिवसेनेचा महापौर  झाला असला तरी स्थायी समिती अध्यक्षपद आपल्याकडं यावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक होती. आता मनसेचा पाठिंबा मिळाल्यामुळं महापालिकेच्या सभागृहात शिवसेना-भाजप आणि काँग्रेस आघाडी यांचं संख्यबळ समसमान झालं आहे. त्यामुळं स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी काँग्रेस आघाडीचा दावा मजबूत झालाय.
 
ठाणे महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीत नंतर मरगळलेल्या काँग्रेस आघाडीच्या गोटात मनसेच्या पाठिंब्यामुळं पुन्हा जोश आला आहे. काँग्रेस आघाडीशी मैत्री केली असली तरी आपल्या नगरसेवकांवर आघाडीचं जोखड राहाणार नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय. मनसेच्या या नव्याखेळी मुळं शिवसेना-भाजपची मात्र डोकेदुखी वाढली आहे. महापालिका निवडणुकनंतर आपण किंग किंवा किंगमेकर बनणार असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. तोच अनुभव आता विरोधकांना येत आहे.ठाणे महापालिका महापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेना भाजपला पाठिंबा देवून मनसेनं किंग मेकरची भुमिका बजावली तर स्थायी समितीच्या निवडणुकीतही मनसेच किंगमेकर ठरलीय.
 
ठाण्यात मनसेन घेतलेल्या भुमिकेला अनेक पैलू आहेत या निर्णयातून सेनेला नाशिक बाबत सडेतोड उत्तर देतानांच आपली ताकद दाखवून दिलीय तर कुणीही गृहीत धरून नये असा संदेश मनसे प्रमुखांनी दिलाय.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नव्या खेळीमुळं शिवसेना-भाजप युतीची ठाण्यात कोंडी झालीय. महापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळी बहुमतात असेलेल्या युतीला स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. पालिका आणि जिल्हापरिषद निवडणुकीनंतर मनसेनं अनेक ठिकाणी किंगमेकरची भूमीका बजावलीय. ठाण्यातही तेच चित्र पहायला मिळालं. मात्र आता ठाण्यातलं चित्र बदललंय. मनसेचं इंजिन काँग्रेस आघाडीच्या ट्रॅकवर आलंय. मनसेच्या या नव्या खेळी मागे नाशिक महापालिकेतील महापौर पदाच्या निवडणुकीचा संदर्भ असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
 
पालिका आणि जिल्हापरिषदांच्या निवडणुकीत मनसेने आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे मनसेची दखल सगळ्याच राजकीयपक्षांना घ्यावी लागलीय. शिवसेना-भाजप युतीमध्येही यावरुन बरंच खल झाला आहे.
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेची वाढलेली लक्षात घेता इतर राजकीय पक्ष सावध झाले आहेत. गेल्या काही दिवसात मनसेची भूमिका पहाता  आगामी विधानसभेच्या दृष्टीने  मनसेकडून ही नवी खेळी तर केली जात नाही ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात  केली जात आहे.
 
महाराष्ट्राच्या राजकारणात मनसेनं पकड घेण्यास सुरुवात केली असून आगामी काळात राज्याच्या राजकारणाचं हुकमी पान आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न मनसेकडून  केला जाणार आहे. मनसेनं आतापर्यंत कोणाशीही युती अथवा आघाडी न करण्याचं सूत्र बाळगलं होतं..मात्र नुकतेच पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर त्यांनी रणनीती बदलली. त्याचा काही राजकीयपक्षांना फायदा झाला तर काहींना  फटका बसला.
 

राज्यात नुकत्याच पार प़डलेल्या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपली ताकद दाखवून दिलीय. राजकीय विश्लेषकांच्या तर्कवितर्कांना खोटं ठरवत नाशिकमध्ये  पक्षानं सत्ता काबीज केलीय, तर पुण्यातही शिवसेना- भाजपला मागे टाकत विरोधी पक्षनेत्याची खुर्ची पटकावलीय. मनसेच्या या राजकीय खेळीनं इतर राजकीय पक्षांना विचार करण्यास भाग पाडलं आहे. महापालिकेत मिळविलेल्या आपल्या राजकीय ताकदीचा योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीनं वापर करण्यात मनसे यशस्वी झालीय. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेली राज ठाकरेंची मैत्री त्यांच्या या वेळी कामाला आलीय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी राज ठाकरेंची मैत्री सर्वश्रूत आहे. नाशिकमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत ज्या प्रकारे नाट्यमयरित्य घडामोडी घडल्या त्या पहाता आगामी काळात राज ठाकरेंची राजकीय खेळी इतर पक्षांसाठी तापदायक ठरण्याची शक्यता वर्तवली जातेय. महाराष्ट्रात उदयास आ
लेली ही नवी राजकीय शक्ती आता राज्याच्या राजकारणात एक नवीन पॉवर सेंटर बनत चालली आहे. मनसेला केवळ महापालिकेत यश मिळालंय असं नाही तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही काही प्रमाणात यश मिळालं आहे. त्यामुळे केवळ शहरी भागातील पक्ष अशी ओळख पुसण्यात यावेळी मनसेला यश आलं आहे. पक्षाची ताकद असलेल्या ठिकाणीचं निवडणूक लढवून ती जिंकायची अशी रणनीती मनसे अध्यक्षांनी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकींपूर्वी आखली होती. त्यांनी मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या मोठ्या महानगरपालिकांवर लक्ष केंद्रित केलं होतं. मुंबईत त्यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं. पण मुंबईला लागून असलेल्य़ा महापालिकेत त्यांना आपेक्षित यश मिळवता आलं नाही. खरंतर त्यामागे अनेक कारणं असल्याचं बोललं जातंय. राज ठाकरेंनी उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर ठाण्य़ातील कार्यकत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला होता.
 
निवडणुकींपूर्वी काही प्रमाणात वाद शमवण्यात पक्षनेतृत्वाला यश आलं होतं, मात्र निवडणुकीत त्याचा फटका पक्षाला बसलाच आणि त्यांना अपेक्षित यश मिळवता आलं नाही. पुणेकरांनी मात्र मनसेला भरभरुन मतदान केलं आणि त्यामुळेच पक्षाकडे विरोधी क्ष पद चालत आलं. पुण्यातल्या महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेनं तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा  मार्ग आणखी सुकर झाला होता. तशीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनंही नाशिकमध्ये घेतल्यामुळे मनसेचा मार्ग सुकर झाल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. एकूणच सत्तेचा सारिपाट मांडताना योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमताही राज ठाकरेंनी दाखवून दिलीय. भविष्यात अशीच अचूक पावलं पडली तर सत्तेच्या राजकारणात मनसेही पुढे जाऊ शकते.
 




First Published: Friday, March 30, 2012, 23:53


comments powered by Disqus