Last Updated: Wednesday, April 11, 2012, 20:06
www.24taas.com, पुणे 
आज थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुलेंची १८५ वी जयंती. पुण्यातला फुलेवाडा आजही फुलेंच्या कार्याची साक्ष देतो. या वाड्याचा आढावा घेतानाच, महात्मा फुलेंनी उभारलेल्या समाज परिवर्तनाच्या चळवळीचा आवाका फारच मोठा होता.
महात्मा फुलेंचं कार्य अजरामर आहे. एकपात्री नाट्य कलाकार कुमार अहिरे यांनी आजपर्यंत १०० हून जास्त प्रयोगांच्या माध्यमातून ज्योतिबा साकारले. पुण्यातला फुले वाडाही क्रांतीसूर्याच्या कार्यकर्तुत्वाची साक्ष देणारा ठरतो. १८२७ ते १८९० दरम्यान ज्योतिबा फुलेंचं या वाड्यात वास्तव्य होतं.
ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई या दाम्पत्याचं ओझरतं चरित्र या वाड्यात पहायला मिळतं. दोघांचा विवाह, ज्योतिबांचे सहकारी, तालीम, त्यांच्या हस्ताक्षरीतली पत्रं अशा अनेक गोष्टी इतिहासाची उजळणी घडवतात.

जातिभेदाचं उच्चाटन, दलितांचा उद्धार, विधवा विवाह आणि स्त्री शिक्षण अशा विविध क्षेत्रांत ज्योतिबांनी क्रांती घडवली. पण फुलेंचा वारसा म्हणाला तितका जपला गेला नाही, याची खंत आजही जाणवते. महात्मा फुले आणि सावित्री फुलेंनी मुलींसाठी ज्या ठिकाणी पहिला शाळा सुरू केली, तो भिडे वाडा आज भग्नावस्थेत आहे.
शक्त समाज उभारणाऱ्या समाजपुरुषांची अशी परवड नक्कीच परवडणारी नाही. फुले वाड्यात महात्मा फुलेंची समाधी तुळशी वृंदावनाच्या रुपानं जपण्यात आली आहे. पण त्यांचे विचार जपण्याची मोठी जबाबदारी सगळ्यांवरच आहे.
First Published: Wednesday, April 11, 2012, 20:06