मुलाची हूल, निवडणुकीतून गूल; म्हणे, 'डॉक्टरचीच भूल'! - Marathi News 24taas.com

मुलाची हूल, निवडणुकीतून गूल; म्हणे, 'डॉक्टरचीच भूल'!

झी २४ तास वेब टीम, यवतमाळ
 
निवडणूकीत कुठल्याही थराला राजकारणी जातील याचा नेम नाही. २००१ नंतर ज्यांना तिसरं अपत्य झालंय त्यांना निवडणूक लढवता येत नसल्यानं तिसरं अपत्य लपवण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरल्याची उदाहरणं आतापर्यंत घडलीत. पण यवतमाळमधल्या एका इच्छुकानं तिसऱ्या अपत्याचं खापर चक्क डॉक्टरवरच फोडलंय.
यवतमाळ जिल्ह्यातल्या या महेंद्र दुधेंना दारव्हा नगरपरिषदेची निवडणूक लढवायची आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्यांनी निवडणुकीची  जोरदार तयारीही सुरू केली होती. मात्र तिसरं अपत्य झाल्यानं त्यांची गोची झाली आहे. दोन अपत्यांवर पत्नीवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केली, पण त्यानंतरही पत्नी गर्भवती राहिली आणि तिसरं अपत्य झालं. दुधेंचं राजकीय भवितव्यच त्यामुळे धुळीला मिळालं.
 
पण दुधेंनी अजूनही हार मानलेली नाही.तिसऱ्या अपत्याचं खापर अयशस्वी शस्त्रक्रिया करणा-या डॉक्टरवर फोडत, त्यांनी निवडणूक आयोगाकडे निवडणूक लढवण्यासाठी परवानगी मागितली आहे. या प्रकरणी त्यांनी न्यायालयाचेही दरवाजे ठोठावलेत. निवडणूक लढवण्यासाठी दुधे यांनी हा फंडा वापरला असला तरी डॉक्टरांनी मात्र हात झटकलेत. अर्थात चौकशी करुन त्याबाबत अहवाल मागवू असं सांगत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दुधे यांच्या आशा पल्लवीत ठेवल्यात.
 
महेंद्र दुधे निवडणूक लढवण्यासाठी गुडख्याला बाशिंग बांधून  तयार होते. आता दुधेंच्या मागणीवर निवडणूक आयोग आणि न्यायालय काय निर्णय देतं यावर त्यांचं भवितव्य अवलंबून आहे. याआधी सत्तेच्या खुर्चीसाठी तिसऱ्या जीवंत अपत्याचा चक्क मृत्युचा दाखला देण्याचा प्रताप नाशिक जिल्ह्यात उघडकीस आला होता. तर अंबरनाथमध्ये तिसरं मूल वहिनीच्या गळ्यात मारणाऱ्या सरपंचाचा पर्दाफाशही झाला होता. आता यवतमाळमधला हा प्रकार असाच चर्चेचा विषय ठरलाय.

First Published: Wednesday, November 23, 2011, 07:59


comments powered by Disqus