Last Updated: Wednesday, November 23, 2011, 14:12
झी २४ तास वेब टीम, वसई 
वसईच्या तामतलाव परिसरात रेशनिंग दुकानात निकृष्ट दर्जाचं धान्य पुरवलं जात असल्याचा पर्दाफाश झी 24 तासनं केला होता. त्यानंतर संतप्त महिलांनी या दुकानावर हल्लाबोल केला. त्यानंतर संतापलेल्या दि पिपल्स मध्यवर्ती सहकारी भांडाराच्या पदाधिकाऱ्यांनी पुरवठा निरीक्षकांनाच घेराव घातला.
वसई तहसीलदार ऑफिसमध्ये पुरवठा निरीक्षकांना घेराव घालणारे हे नागरिक काही आंदोलन करत नाहीत. तर आपल्या बनवेगिरीचा भांडाफोड झाल्यानं वसई तालूका दि पिपल्स मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराचे पदाधिकारी संतापले. ग्राहक भांडाराच्या दुकानातून निकृष्ट दर्जाचं धान्य विकलं जात असल्याचा पर्दाफाश झी 24 तासनं केला. यानंतर संतापलेल्या महिलांनी दुकानदाराला चोप दिला.
या प्रकारानं संतापलेल्या ग्राहक भांडाराच्या पदाधिकाऱ्यांनी तालुका पुरवठा निरीक्षकांना घेराव घालून चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार केला. जणू काही निकृष्ट आणि सडकं धान्याचा पुरवठा होतच नसल्याचा रुबाब या पदाधिकाऱ्यांचा होता. वसई तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी या पदाधिकाऱ्यांची दादागिरी ऐकून घेतली. दुकानाला चांगल्या प्रतीचं धान्य पुरवल्याचं त्यांनी सांगितलं. मग नंतर गौडबंगाल कुणी केलं याचं उत्तर पदाधिकाऱ्यांकडं नाही.
राजकीय बळाच्या जोरावर हम करे सो कायदा अशीच प्रवृत्ती या पदाधिकाऱ्यांची दिसत होती. त्यातून निकृष्ट दर्जाचं धान्य पुरवलं, तरी आपल्याला कोण हात लावणार अशीच मुजोरी यांच्या वर्तनातून दिसून आली. आता सरकार यावर काय कारवाई करणार याकडं सगळ्याचं लक्ष आहे.
First Published: Wednesday, November 23, 2011, 14:12