'सद रक्षणाय' की 'सदा झोपणाय'....??? - Marathi News 24taas.com

'सद रक्षणाय' की 'सदा झोपणाय'....???

झी 24 तास वेब टीम, डोंबिवली
 
कल्याण-डोंबिवलीमध्ये पोलीस काय करत आहेत ? असा संतप्त सवाल सध्या सामान्य नागरिकांकडून विचारला जातो आहे. त्याचं उत्तर पहा झी 24 तासवर. दरोडेखोरांनी हल्ला केल्यानंतर सर्वसामान्यांनी जीवाची पर्वा न करता सामना केला. त्यावेळी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस चक्क झोपा काढत असल्याचं समोर आलं.
 
डोंबिवलीतल्या जलाराम मंदिर परिसरात, सागरज्योती आणि यशोमंदिर अपार्टमेंटमध्ये स्थानिक नागरिक आणि दरोडेखोरांमध्ये अर्धातास थरारनाट्य रंगलं होतं. यावेळी दरोडेखोरांच्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले. यात मनसेचे नगरसेवक हर्षल पाटील आणि माजी आमदार हरिश्चंद्र पाटील यांचाही समावेश आहे. अर्धा तास चाललेल्या या थरारनाट्यात नागरिकांनी तीन दरोडेखोरांना पकडून दिलं.
 
हा सर्व प्रकार सुरु असतांना मनसेचे जखमी नगरसेवक हर्षल पाटील सातत्यानं पोलीस स्टेशनला फोन करत होते. पण, पोलिसांनी प्रतिसाद दिला नाही. धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी यावर फोनचे बिल न भरल्याचं कारण दिलं. केवळ रहिवाशांच्या जागरूकतेमुळे 8 ते 10 दरोडेखोरांचा प्रयत्न उधळला गेला. आणि कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले असताना पोलीस झोपा काढत असल्याचं आढळून आलं. घटना घडून अर्धा तासांनंतर पोलिसांनी दरोडेखोरांना अटक केली. सद रक्षणाय खल निग्रणाय असं ब्रीदवाक्य घेऊन मिरवणाऱ्या पोलिसांच्या झोपांनी मात्र सामान्यांची झोप उडवली. त्यामुळंच डोंबिवलीकरांमध्ये पोलिसांच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त होतो आहे.

First Published: Sunday, November 27, 2011, 17:27


comments powered by Disqus