Last Updated: Friday, May 11, 2012, 00:13
www.24taas.com, मुंबई तुम्हाला एखादा किरकोळ आजार झाला असेल आणि त्यासाठी जर डॉक्टर तुम्हाला महागडी औषधं आणि भरमसाठ वैद्यकीय चाचण्या करण्यास सांगत असतील तर त्यामध्ये नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे असं समजा...तुमच्याकडून महागडी औषधं खरेदी करुन घेतल्याच्या बदल्यात कदाचीत डॉक्टरांना कमीशन मिळत असेल.
डॉक्टर आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांच्यातल्या याच काळ्या धंद्याचा आम्ही पर्दाफाश केलाय. औषधांची निर्मिती करणा-या कंपन्यांच्या सूत्रांकडून आमच्या प्रतिनिधीला एक खात्रीलायक माहिती मिळाली होती...ती माहिती अत्यंत धक्कादायक असून रुग्णांचा डॉक्टरवर आलेल्या विश्वासाला तडा जाण्याती शक्यता आहे आणि त्यासाठी कारणीभूत आहेत काही डॉक्टर्स...
महागडी औषधं खपविण्यासाठी काही डॉक्टर्स चक्क औषध कंपन्यांकडून कमीशन घेत आहेत..आणि त्याची चाट मात्र सर्वसामान्य रुग्णांच्या खिशाला बसतेय. रुग्णांचा विश्वासघात करुन आपले खिसे भरणा-या अशा डॉक्टरांचा पर्दाफाश करण्यासाठी आमचा प्रतिनिधी छुपा कॅमेरा घेऊन पोहोचला मुंबईतील के.ई.एम रुग्णालयात ...त्यावेळी एका औषध कंपनीचा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह रुग्णालयातील डॉक्टरच्या भेटीसाठी आला होता...आमचा प्रतिनिधीही त्याच्या सोबत गेला..मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि डॉक्टर यांच्यात जो व्यवहार झाला तो मोठा धक्कादायक होता..
मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हने बोलवताच केबिनमध्ये बसलेली महिला डॉक्टर ताडकन उठून केबिन बाहेर आली....आजू-बाजूचा अंदाज घेतल्यानंतर रुग्णालयाच्या कॅरिडोरमध्ये ते आले..आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हने पाच हजार रुपयांचं एक गिफ्ट व्हाऊचर त्या महिला डॉक्टरांना दिलं..त्यांनीही मोठ्या खुषीत ते स्विकारलं...विशेष म्हणजे त्या गिफ्ट व्हाऊचर सोबत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हने औषधांची एक लिस्टही डॉक्टरकडं दिली होती... मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हकडून केवळ या एकाच डॉक्टरने गिफ्ट व्हाऊचर स्वीकारलं असं नाही तर आणखी काही डॉक्टर अशाच पद्धतीने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हकडून गिफ्ट व्हाऊचर स्विकारलं
मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हकडून गिफ्ट व्हाऊचर घेतल्यनंतर त्याला अशाच प्रकारे वारंवार रुग्णालयात येण्याचा सल्ला या डॉक्टरांनी दिला..तसेच रुग्णालयातील अन्य डॉक्टरांशी ओळख करुन देण्याचं आश्वासनही या डॉक्टर महाशयांनी दिलं. औषध कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ घेत नसल्याचा दावा भलेही डॉक्टर मंडळींकडून केला जात असली तरी डॉक्टरांना मोफत गिफ्ट व्हाऊचर वाटण्या मागचं औषध कंपन्यांचं राज आता लपून राहिलं नाही.महागडी औषधं रुग्णांच्या माथी मारण्याचं काम काही डॉक्टर मंडळींकडून केलं जात असून त्याच्या बदल्यातच डॉक्टरांना अशा प्रकारची बक्षीशी औषध कंपन्यांकडून दिलं जात असल्याचं आमच्या प्रतिनिधीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झालं आहे..
वैद्यकीय क्षेत्रात कशा पद्धतीने हा काळा धंदा सुरु आहे हे आताच आम्ही तुम्हाला दाखवलंय..डॉक्टर्स मेडिकल रिप्रेझेंटिव्हजकडून पाच वर्षाचं गिफ्ट व्हाऊचर घेत असलेल्याचं तुम्ही बघीतलंय..पण हे केवळ एवढ्यापूरतंच मर्यादीत नाही...तर त्याच्या पलिकडं जाऊन विविध प्रकारच्या भेट वस्तू औषध कंपन्या डॉक्टर्सना दरवर्षी देत असतात...
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांनुसार डॉक्टरांना औषध कंपन्यांकडून कोणत्याच प्रकारची भेटवस्तू ,रोख रक्कम किंवा अन्य सुविधा घेता येत नाहीत..पण डॉक्टर आणि औषध कंपन्यांनी हे नियम अक्षरश: धाब्यावर बसवले आहेत...डॉक्टर्स आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांच्यातल्या त्या धंद्याचं सत्य आमच्या छुप्या कॅमे-यात कैद झालं आहे...देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरातील दवाखाण्यात हे प्रकार सर्रासपणे सुरु असल्याचं आता उघड झालं आहे...त्यामुळे वैद्यकीय व्यवसायाची ही काळीबाजू जगासमोर आलीय..ठरावीक कंपन्यांच्या महागड्या औषधांचा खप वाढावा म्हणून डॉक्टर्स आपल्या रुग्णांना ती औषधं खरेदी करण्यास सांगतात...तर औषध कंपन्या त्याचा मोबदला भेटवस्तूंच्या रुपात डॉक्टरांना चुकता करतात.डॉक्टर्स आणि औषध कंपन्यांच्या या साट्यालोट्यात मात्र सर्वसामान्य रुग्णांचा खिसा नकळतपणे रिकामा होतोय....
औषध कंपन्यांकडून डॉक्टर्सना गिफ्ट कार्ड, कॅश प्री-पेड कार्ड, गिफ्ट व्हाऊचर, सिल्वर पॉट,आय-पॅड,महागडे मोबाईल फोन,ब्रँडेड शर्ट,घड्याळ,शूज अशा विविध वस्तू भेट म्हणून दिल्या जातात.... डॉक्टर्सनी औषध कंपन्यांच्या औषधाचा खप ठरावीक रक्कमे पर्यंत करुन दिल्यास औषध कंपन्या त्या बदल्यात डॉक्टर्सना परदेशी सहलीसाठी पाठवतात..
व्हीओ 2- औषध कंपन्यांकडून डॉक्टर्ससाठी दरवर्षी ठरावीक रक्कमेची तरतूद केली जाते...त्यापैशातून डॉक्टर्संना भेटवस्तू दिल्या जातात...आज विविध औषध कंपन्यांचे लाखो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह औषधांची विक्री वाढावी म्हणून काम करत आहेत...मोठ्या औषध कंपन्यांकडून आपल्या मेडिकल रिप्रेझेंटेटीव्हला दरवर्षी 10 ते 12 लाख रुपये दिले जातात..मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह ती रक्कम डॉक्टर्सवर खर्च करतात... डॉक्टर जेव्हड्या जास्त प्रमाणात आपल्या रुग्णांना त्या ठरावीक कंपनींचं औषध खरेदी करण्यास सांगितील तेव्हड्या प्रमाणात संबंधीत कंपनी डॉक्टर्सला मालामाल करते...औषध कंपन्यांच्या औषधांचा खप वाढविण्याचं काम डॉक्टर्सकडून केलं जात असल्यामुळं अशा डॉक्टर्संना जाळ्यात ओढण्यासाठी मेडिकल रिप्रेझेंटेटीव्हजमध्ये आज चढाओढ लागल्याचं पहायला मिळतंय...डॉक्टर मंडळींना महागड्या भेट वस्तूंचं आमिष दाखवलं जातंय..आणि काही डॉक्टर्सही त्या आमिशाला बळी पडत आहेत...जर एखाद्या औषध कंपनीने डॉक्टर्सना देशातील एखाद्या पर्यटनस्थळाच्या सहलीसाठी पाठविल्यास दुसरी कंपनीकडून परदेशी सहलीचं पॅकेज दिलं जातं...

डॉक्टर आणि औषध कंपन्या छुप्यारितीने हा सगळं गौडबंगाल करत असून हा खेळ रुग्णांच्या जराही लक्षात येत नाही...मेडिकल रिप्रेझेटेटिव्ह डॉक्टर्सची भेट घेण्यापूर्वीच त्यांच्या दवाखान्याच्या परिसरातील औषध दुकानात आपल्या कंपनीचं औषध पोहोचवतो. त्यानंतर डॉक्टरांना आपल्या कंपनीच्या औषधांचा खप वाढविण्यासाठी राजी केलं जातं..डॉक्टर आणि औषध कंपनी यांच्यातल्या या संगनमताचा दोघांना जबरदस्त फायदा होतोय...मात्र डॉक्टरांना देव मानणा-या रुग्णांची एकप्रकारे लूट केली जातेय..
औषध कंपन्या आणि डॉक्टर यांच्यामध्ये असलेल्या साटलोट्याच्या फटका हा सर्वसामान्य रुग्णांना बसतोय. कारण या संगनमताविषयी रुग्ण अनभिज्ञ असतो ...खरंतर बाजारात अनेक स्वस्त किंमतीच्या औषधांचे पर्याय उपलब्ध असतात..पण त्याची कल्पना रुग्णाला नसते...त्यामुळे रुग्णायाच्या बिलाचा आकडा वाढत जातो...
मुंबईतील रहिवासी असलेले आदित्य सिंह यांनी नुकतेच आपल्या चुलतीवर वैद्यकीय उपचारासाठी जवळपास चार लाख रुपये खर्च केलेत...त्या चार लाखांपौकी जवळपास एक लाख रुपये त्यांच्या विविध वैद्यकीय तपासण्यांवर खर्च झालेत....आजाराशी दूरदूरचा संबंध संबंध नसलेल्या चाचण्याही डॉक्टरांनी जाणूनबूजून करुन घेतल्या आहेत....आदित्यच्या चुलतीच्या काही महागड्या चाचण्यातर वारंवार करण्यात आल्या आहेत..रुग्णांच्या आजाराचं नेमक निदान व्हावं तसेच त्याची तीव्रता कळावी यासाठी पूर्वी डॉक्टर्स विविध चाचण्या करण्याचा सल्ला देत असतं...पण आज पॅथालॉजी लॅब चालविणा-यांकडून डॉक्टरांना कमीशन दिलं जात असून त्यामुळे डॉक्टरही जास्तीतजास्त चाचण्याकरुन घेण्यास सांगतात..जर एखाद्या रुग्णालयाची स्वताची पॅथालॉजी लॅब असेल तर तिथल्या डॉक्टर्सना रुग्णांकडून जास्तीत जास्त चाचण्या करुन घेण्यासाठी दबाव टाकला जातो..
केवळ वैद्यकीय चाचण्याच नाही तर विविध औषधांसाठीही हाच फॉर्म्यूला डॉक्टर्सकडून वापला जातोय..गरज नसतांनाही डॉक्टर्स रुग्णांना काही औषधं लिहून देतात..जर SENSICLAV 625 नावाचं औषध एखादी कंपनी 80 रुपयात विकत असेल तर डॉक्टर AUGMENTIN 625 नावाचं औषध खरेदी करण्यास सांगण्याची दाट शक्यता असते..कारण या ओषधाची किंमत 250 रुयांच्या घरात आहे...विशेष म्हणजे या दोन्ही औषधांचा परिणाम एक सारखाचं आहे....अशाच पद्धतीने FDC च्या Z PAN 40 या औषधाची किंमत 25 रुपये इतकी आहे तर PAN 40 या औषधाची किंमत40 रुपये इतकी आहे...या दोन्ही औषधांचा परिणाम एकसारखाच आहे..खरंतर रुग्णांना औषधं आणि त्यातील पर्यायांची जरही कल्पना नसते...आणि त्याचाच लाभ औषध कंपन्या आणि डॉक्टर मंडळींकडून उठवला जात आहे..
डॉक्टर आणि औषध कंपन्यांत साटेलोटं असल्याची चर्चा नेहमीच होत आलीय, झी 24तासने हा प्रकार सर्वांसमोर आणल्यानंतर या घटनेची मुंबईच्या महापौरांनी गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिलेत.
First Published: Friday, May 11, 2012, 00:13