कहाणी मलालाची... , the story of Malala

कहाणी मलालाची...

www.24taas.com, मुंबई
पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यात राहणाऱ्या एका १४ वर्षाच्या चिमुरडीने कट्टर तालिबान्यांविरोधात बंड केलं. मुलींच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी तिने आवाज उठवला खरा पण त्याची जबर किंमत तिला मोजावी लागली. तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात ती निरागस मुलगी गंभीर जखमी झाली. पण त्यानंतर मात्र तालिबान हादरुन गेलंय. तालिबानला आता तिची भीती वाटू लागलीय. तोफांच्या भडीमारालाही न घाबरणारे तालिबानी त्या चिमुरडीला का घाबरलेत? अशी कोणती ताकत आहे त्या कोवळ्या मुलीकडं? जिवघेण्या हल्ल्यातून बचावणार का ही मुलगी? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेऊयात... ‘कहाणी मलालाची’मध्ये


कहाणी मलालाची...




स्वातचं खोरं... पाकिस्तानातील अत्यंत सुंदर असं डोंगराळ भभाग... निसर्गसौंदर्याने नटलेला... कधी काळी इथं प्रेमाचं संगीत इथं ऐकायला मिळायचं. पण, आज त्याची जागा गोळीबाराच्या कर्कश्य आवाजाने घेतली. त्यामुळे इथलं सगळं वातावरणचं बदलून गेलंय. सुख, शांती, प्रेम या सगळ्यालाच तालिबान्यांच्या दहशतीने ग्रासलंय. ९ ऑक्टोबर २०१२... मिंगोरा, स्वात खोरं... चिमुकल्या डोळ्यात उज्वल भविष्याचे स्वप्न घेऊन काही शाळकरी मुली शाळेतून घरी परतत होत्या. पण अचानक त्यांची स्कूल काही शस्त्रधारी लोकांनी वाटेत अडवली. बसमधील त्या चिमुरड्या मुलींना मोठी दाढी असलेल्या एका सशस्त्र व्यक्तीने दरडावून विचारलं, ‘तुमच्या पैकी मलाला कोण आहे? सांगा नाहीतर सगळ्यांना गोळ्या घालीन...’ त्या चिमुरड्यामुलींमध्ये मलालाही होती. पण तिच्या चेहऱ्यावर भितीची एकही लकेरही नव्हती... ना तिने लपण्याचा प्रयत्न केला. त्या सशस्त्र व्यक्तींसमवेत असलेल्या एकाने मलालाला ओळखलं आणि त्यानं १४ वर्ष वयाच्या मलालाच्या डोक्याजवळ बंदूक नेली आणि तिचा चाप ओढला. कोवळ्या शरिरात गोळ्या घुसल्यामुळे मलाला गंभीर जखमी झाली. सैतानी तालिबान्यांच्या गोळीबारात मलालाचं शरिर जरी जखमी झालं असलं तरी तिच्या जबरदस्त हिंमतीवर ते जराही ओरखडा ओढू शकले नाहीत. रुग्णालयात जाते वेळी मलालाचे नाजूक हात तिचे पिता युसुफजई यांच्या हातात होते. तिची ती अवस्था पाहून युसुफजईंनी धीर सोडला होता. पण छोटी मलाला किलकिल्या डोळ्यातून पहात पित्याला म्हणली. ‘चिंता करु नका, मी बरी होईल... शेवटी विजय आपलाच होणार आहे’. बेशुद्ध होण्यापूर्वी मलालाने हे शेवटचं वाक्य उच्चारलं होतं. पण त्या कोवळ्या मुलीचा तो आवाज संपूर्ण स्वात खोऱ्यात घुमला. तिच्या आवाजापुढं तालिबान्यांच्या बंदूकीचा आवाजाही फिका पडला. विशेष म्हणजे मलालाचा तो आवाज अवघ्या जगाने ऐकला.

१४ वर्षाच्या मलाला युसुफजाईने वयाच्या ११व्या वर्षी तालिबान्यांविरोधात आवाज उठवला होता. तालिबान्यांनी मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्याचा फतवा काढला होता. त्याचा मलालाने विरोध केला होता. २००९ मध्ये बीबीसीच्या उर्दू ब्लॉगवर टोपण नावाने तिने लिखाण सुरु केलं. तालिबान्यांच्या अत्याचाराला तिने ब्लॉगच्या माध्यमातून वाचा फोडली होती. तोफांच्या भडिमारालाही न घाबरणारे तालिबानी मलालाच्या लिखाणामुळे हादरुन गेले होते. तालिबान हारलं खरं पण त्यांच्या भ्याड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मलालाच्या प्रत्येक श्वासाने स्वात खोऱ्यात नव्या क्रांतीला जन्म दिला होता. स्वात खोऱ्यात मुलींच्या शिक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरु लागला आहे. तसेच मलाला लवकर बरी व्हावी यासाठी जगभर प्रार्थना केली जातेय. मलालाला उपचारासाठी स्वात खोऱ्यातून रावळपिंडीच्या सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथं तिच्या डोक्यात घुसलेली गोळी काढण्यात आली. पण तिची प्रकृती नाजूक बनल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी ब्रिटनला हलवण्यात आलंय.


कहाणी मलालाची...

चिमुरड्या मलालाने कट्टर तालिबान्यांना आव्हान दिलं आणि तालिबान्यांनी तिच्यावर जिवघेणा हल्ला केला. पण मलालामध्ये इतकी हिम्मत आली कुठून असा प्रश्न पडल्या शिवाय राहात नाही. ब्रिटिश युध्दातील विरांगना कवयत्री मलालाईच्या नावावरुन जिया युसुफजई यांनी आपल्या मुलीचं नामकरणं मलाला ठेवलं होतं. मलालाईप्रमाणे आपल्या मुलीने शूर आणि निडर व्हावं, अशी युसुफजईंची सुरुवातीपासूनची इच्छा होती. जेव्हा युसुफजईंनी तिचं मलाला हे नाव ठेवलं तेव्हा पुढं आपली मुलगी इतकी शूर आणि क्रांतीकारी होईल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. त्यांनी ११ वर्षाच्या मलालाला स्वातंत्र्य आणि लोकशाही मुल्यांचं शिक्षण दिलं. त्यांच्या या शिक्षणामुळेच मलालाची ही अवस्था झाल्याचं काहींचं म्हणणं आहे. पण युसुफजईंना ते मान्य नाही. युसूफजई म्हणतात, `माझी मुलगी जिवंत राहिली न राहिली, तरी आम्ही आमचा देश सोडून जाणार नाही. आमची एक विचारधारा असून आम्ही शांतीचा पुरस्कार केला आहे. बंदुकीचा धाक दाखवून तालिबानी प्रत्येकाचा आवाज दाबू शकणार नाहीत’... जिथं तालिबान्यांनी मुलींच्या शिक्षणावर बंदी घाललीय अशा ठिकाणी जियाऊद्दीन युसुफजई यांनी मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेला ध्यास अंधारात एखाद्या प्रकाश किरणाप्रमाणे भासतोय. डाव्या विचारांचे `जियाउद्दीन’ हे काही वेगळचं रसायन आहे. ते खुशाल पब्लिक स्कूलच्या नावाने अनेक शाळा चालवत आहेत. मुलींना शिक्षणासाठी प्रेरीत करण्याचं काम ते करत आहेत. मलालाने डॉक्टर व्हावं असं त्यांना वाटतंयं. पण समाजात बदल घडवून आणण्यासाठी मलालाला राजकारणी व्हायचंय. आपल्यासोबत शिकणाऱ्या मुलींना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून लढणाऱ्या चिमुरड्या मलाला आज कोणत्या उंचीवर जाऊन पोहोचलीय याचा अंदाज तिच्या शाळेच्या नावावरुनच लावता येईल. ज्या शाळेत मलाला शिक्षण घेतेय तिचं नाव ‘मलाला युसुफजई स्कूल’ असं ठेवण्यात आलंय. २०११ मध्ये पाकिस्तान सरकारने मलाला युसुफजईला पहिल्या ‘राष्ट्रीय शांतता पुरस्कारा’ने सन्मानीत केलं होतं. तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिच्या कामाची दखल घेण्यात आली. पण तिच्यावर झालेल्या जिवघेण्या हल्ल्यामुळे जगभरातील महिलांचं स्वातंत्र्य आणि त्यांच्या शिक्षणाचं प्रतिक म्हणून मलालाकडं बघितलं जाऊ लागलंय. युसुफजई आपल्या मुलीला स्वातंत्र्याचा अर्थ समजावून सांगत असतील त्यावेळी आपल्या मुलीमुळे सगळं जग आपल्याला ओळखील, याचा त्यांनी विचारही केला नसेल.

मलालावर झालेल्या हल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आलीय. ते तिघेजण तालीबानशी संबंधीत असल्याचं उघड झालंय. तालिबान मलालाच्या जीवाची वैरी का बनलीय? हे आता लपून राहिलं नाही. मलाला युसुफजई.. तालीबानच्या बंदूकीची गोळीही तिला आपल्या निश्चयापासून दूर करु शकली नाही. मलाला लहान असताना तिचे वडील युसुफजई शाळेत मुलांना शिकवत असतं. मलालाही शाळेत जात असे. शिक्षण घेऊन आपण डॉक्टर व्हावं, हे स्वप्न तिच्या चिमुकल्या डोळ्यांनी बघितलं होतं. पण, त्याचवेळी रेडिओवरून तालिबान्यांनी स्वात खोऱ्या मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्याचा फतवा जाहीर केला तसंच या फतव्याला विरोध करणाऱ्याला गोळी घालून ठार करण्याची धमकी तालिबान्यांनी दिली होती. आपली शाळा का बंद करण्यात आलीय हे कळण्याचं मलालालाचं वय नव्हतं. तालिबानचा कमांडर मौलाना फजलुल्लाह हा मुल्ला रेडिओच्या नावाने कुख्यात होता. त्याचा विरोध करण्यासाठी मलालाने वेगळा मार्ग निवडला होता. बीबीसीच्या उर्दू ब्लॉगवर ३ जानेवारी २००९ ला मलालाने पहिला ब्लॉग लिहिला होता. त्यात तिनं लिहिलं होतं, ‘माझ्या आईनं माझ्यासाठी नाश्ता बनवला होता. आणि मी शाळेत जाण्याची तयारी केली होती. पण त्यावेळी मी घाबरले कारण मुलींनी शाळेत जावू असा फतवा तालिबान्यांनी काढला होता. त्यादिवशी गुल मकाई म्हणजेच मलालाच्या वर्गात २७ पैकी फक्त ११ विद्यार्थी हजर होते. शाळा सुटल्यानंतर घरी जाताना मलालाला एका व्यक्तीने धमकी दिली की आम्ही तुला ठार करू’… मलालाच्या कोवळ्या मनावर त्या धमकीचा मोठा आघात झाला. पण ती नियमीतपणे ब्लॉग लिहू लागली. त्यामुळे तिला जगभर प्रसिद्ध मिळाली. तिने भीतीला दूर लोटलं आणि त्यामुळेच गुल मकाई ही मलाला असल्याचं सगळ्या जगाला समजलं.



कहाणी मलालाची...

‘तिला मारण्याचा आमचा कोणताही इरादा नव्हता. पण ती नेहमी आमच्या विरुद्ध बोलते. म्हणून हा निर्णय नाईलाजानं घ्यावा लागलाय’ असं स्पष्टीकरण देणाऱ्या तालिबानी म्होरक्यांच्या बैठकीत काही महिन्यांपुर्वीच मलालाला मारण्याचा कट शिजला होता. मलालाला मारण्याची सुपारी दोघा जणाकडं सोपण्यात आली होती. मलाला या हल्ल्यात गंभीर जखमी झालीय. ती मृत्यूशी झुंज देतेय. पण असं असतानाही तिच्यावर पुन्हा हल्ला करणाचं कट कारस्थान रचलं जातंय. यावेळी मलालाचे वडिल जियाउद्दीन हेही तालिबान्यांच्या निशाण्यावर आहेत. कारण जियाउद्दीन हे एका मुलीच्या शाळेचे हेडमास्तर आहेत. त्या शाळेत मलालासारख्या अनेक मुलींना स्वाभिमानाचे धडे देण्याचं काम मलालाचे वडिल करत आहेत. तालिबान्यांना मात्र ते मान्य नाही.

मुलींच्या शिक्षणाचा अधिकार आणि शांततेसाठी मोहिम राबविणाऱ्या निरागस मलाला युसुफजईवर जिवघेणा हल्ला करणं तालिबानला आता चांगलंच महागात पडलंय. कारण आज जगभरातून मलालावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला जाऊ लागला आहे. गेल्या अनेक वर्षात एखाद्या मुद्द्यावरुन तालिबान्यांविरोधात आवाज उठवण्याची पाकिस्तानी जनतेची ही पहिलीच वेळ आहे. मलालाच्या समर्थनार्थ हजारो पाकिस्तानी लोक रस्त्यावर उतरले आहेत. नागरिकांनी तालिबान्यांविरोधात ठिकठिकाणी मोर्चे काढले. यामुळे पाकिस्तान सरकार खडबडून जागं झालं आहे. मलालावरगोळी झाडणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असल्याचं पाकिस्तान सरकारकडून सांगण्यात आलंय. हल्लेखोराला कोणत्याही परिस्थितीत माफ केलं जाणार नसल्याचं सांगण्यात येतंय. मलालावर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध होतोय. अमेरिकेच्या प्रशासनानंही मलालाच्या धैर्याचं कौतूक केलं असून तिला हरप्रकारची मदत करण्याचं आश्वासन दिलंय. मलाला बचावल्यास तिच्यावर पुन्हा हल्ला करण्याची धमकी तालिबानच्या प्रवक्तत्याने दिलीय. त्यामुळे पाकिस्तान सरकारनं मलाला आणि तिच्या कुटुंबीयांना संरक्षण दिलं आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारची जबाबदारी आणखीणच वाढलीय.

First Published: Monday, October 15, 2012, 22:23


comments powered by Disqus