|
 |
गणेशोत्सव : पोलीस सज्ज; भाविक मात्र चिंतेत |
|
www.24taas.com, पुणे गणेशोत्सवासाठी पुणं सज्ज होतंय. पण, या उत्सवावर एक ऑगस्टच्या साखळी स्फोटांचं सावट आहे. सुरक्षित गणेशोत्सव साजरा करणं हे यंत्रणेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. त्यासाठीच काही नवे नियम तयार करण्यात आलेत. पण, सण साजरा करताना हे नियम उत्साहाला मुरड घालणार की काय, अशी चिंता गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना आहे.
पुण्याला वेध लागलेत गणेशोत्सवाचे... पुण्यात झालेल्या साखळी स्फोटांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गणेशोत्सव साजरा होणं हे मोठं आव्हान आहे. त्याच दृष्टीकोनातून गणेश उत्सवात मंडळांनी दोनच कमानी उभाराव्यात, १०० मीटर अंतरापर्यंतच कमानी असायला हव्यात. स्पीकर लाऊ नयेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक आहे, असे नियम गणेशोत्सव मंडळांसाठी तयार करण्यात आलेत. पुण्याचे गणपती पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. त्यामुळे या गर्दीत कोणताही घातपात होऊ नये यासाठी सर्व गणेश मंडळांचं सहकार्य अपेक्षित आहे.
पोलिसांना सहकार्य करण्याची गणेश मंडळांची तयारी आहे. मात्र, पोलीस नियमांचा आणि सुरक्षेचा अवास्तव बडगा उगारतायत, अशी त्यांची भूमिका आहे. कमानीवरच्या जाहिराती हे मंडळांच्या उत्पन्नाचं मुख्य साधन आहे. त्यावरच जर पोलिसांनी गदा आणली तर उत्सव करायचा कसा, असा प्रश्न मंडळांच्या कार्यकर्त्यांना पडलाय. स्पीकरच लाऊ नका, ही सक्ती योग्य नसल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत बैल वापरले म्हणून पोलिसांनी गणेश मंडळांवर गुन्हे दखल केले होते. हा वाद चांगलाच रंगला होता. आता एका बाजूला सुरक्षा आणि दुसऱ्या बाजूला सणाचा उत्साह या दोघांचा मेळ साधणं अवघड नक्कीच आहे. पण सगळ्यांच्याच सहकार्यानं उत्सव निर्विघ्न पार पडणं महत्त्वाचं.
First Published: Thursday, August 30, 2012, 16:12
|
प्रतिक्रिया
प्रतिक्रिया द्या
|
|
|
|
|