Last Updated: Thursday, September 12, 2013, 08:43
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात गौरींचं मोठ्या थाटामाटात आगमन झालंय. महिलांनी वाजत गाजत मोठ्या उत्साहात आपल्या लाडक्या माहेरवाशिणीला घरी आणलं. गणेश भक्तांनी गौराईला मोठ्या मानानं गणपतीच्या बाजूला स्थान दिलं.
गौरींमध्ये उभ्या गौरी, धातूच्या गौरी, तेरड्याच्या गौरी असे विविध प्रकारही आढळतात. भाद्रपद शुद्ध पक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीचे पूजन केले जाते, म्हणून याला ज्येष्ठा गौरी म्हटले जाते. तर काही ठिकाणी केवळ नदी, वहाळातील पाच किंवा सात खडे आणून गौरीपूजन केलं जातं.
गणपती बाप्पांचं आगमन झालं की लगेच वेध लागतात ते गौरीच्या आगमनाचे... गौरींचं आगमन झालं, की घरात चैतन्य निर्माण होतं. गौरीच्या रुपानं लेकी माहेरी येतात अशी धारणा असते. आज गौरींचं आगमन होतं, दुसऱ्या वशी त्या मिष्ठान्न भोजन घेतात आणि तिसऱ्या दिवशी त्या पुन्हा जायला निघतात अशी श्रद्धा आहे. गौरी ही लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. गणपतीबाप्पांसोबत गौरीचंही आगत-स्वागत मोठ्या थाटानं केलं जातं. त्यानंतर त्यांची यथासांग पूजा करून पंचपक्वान्नांचा नैवेद्य अर्पण केला जातो.
घराघरांत स्थानापन्न होणाऱ्या गौरींचे प्रकार मात्र वेगवेगळे असतात. गौरीची मूर्तीची प्रतिष्ठापना करून किंवा सायंकाळी नदी, वाहते पाट किंवा ओढ्यांमधले खडे आणून पारंपरिक पद्धतीनं गौराईची पूजा केली जाते. अनेक ठिकाणी गौरीचा मुखवटा सजवून पूजा करण्यात येते. त्यानंतर गौरीला खूश करण्यासाठी पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. अनेक ठिकाणी मांस-मटणाचा नैवेद्य दाखवण्याची पद्धतही आहे. या गौरींचं आगमन पूर्वा नक्षत्र असताना होते त्या वर्षी गौरींचे हौसे साजरे केले जातात.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.