एक बाप्पा... ३०० वर्षांपासून पाहतोय भक्तांची वाट!, ganesh statue made by rayappa vaishya waiting for devotee

एक बाप्पा... ३०० वर्षांपासून पाहतोय भक्तांची वाट!

एक बाप्पा... ३०० वर्षांपासून पाहतोय भक्तांची वाट!
www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर

चंद्रपूर शहरात एक गणपती ३०० वर्षांपासून भक्तांची वाट पाहतोय. ऐकून चक्रावलात ना? पण, हे खरं आहे.... हे वृत्त म्हणजे केवळ बातमी नसून धक्कादायक वास्तव आहे.

चंद्रपूर... गोंड शासकांची प्राचीन राजधानी... १७ व्या शतकात या नगराचे प्रधान रायप्पा वैश्य यांनी इथं एक भव्य शिवमंदिर बांधण्याचा संकल्प केला. त्यासाठी याच भागातील माना टेकडी परिसरातून एकसारखे पाषाण मंदिरस्थळी आणले गेले आणि रात्रीचा दिवस करून शिल्पकारांनी मंदिर परिसरात घडवल्या एकापेक्षा एक १६ सुबक मूर्त्या... ज्यात महागणपती, शिवलिंग, देवी दुर्गा, मत्स्यावतार, कुर्मावतार, दशावतार,नंदी, शेषनाग, हनुमान, गरुड़, हत्ती, कालभैरव यांचा समावेश होता. मात्र, हे काम सुरू असताना रायप्पांचा मृत्यू झाला आणि मंदिराचं काम बंद पडलं. तेव्हापासून चंद्रपूरचं कडक ऊन, धो धो पाऊस आणि प्रदूषण झेलत या मूर्त्या आहे त्याच जागी पडून आहेत, असं इतिहास संशोधक अशोकसिंग ठाकूर सांगतात.

या सोळा मूर्त्यांमध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आहे ती दहा फुटी महागणपतीची अखंड पाषाणातली मूर्ती... या गणेशाच्या मस्तकावर नागरूपी छत्र आहे. असा गणेश विरळाच... शिवाय या गणेशाची शिल्पकला कन्नड शैलीतील आहे. मंदिरच उभारलं गेलं नसल्यानं या गणेशाची कधी पूजाच झाली नाही. धर्मशास्त्रानुसार प्राणप्रतिष्ठा झाली नसल्यानं हा महागणपती काळाचा मारा सहन करत तब्बल ३००हून अधीक वर्षांपासून भक्तांच्या पूजेची प्रतिक्षा करतोय.

अत्यंत सुबक व शिल्पकलेचा वारसा सांगणाऱ्या या मूर्त्या चंद्रपूरकरांच्या दुर्लक्षित मानसिकतेचा इतिहास सांगताहेत. पुरातत्व विभागाने जागोजाग ढासळलेली एक संरक्षक भिंत बांधून आपली जबाबदारी झटकलीय. आजूबाजूचे लोक या परिसराचा वापर जुगार खेळण्यासाठी आणि त्याज्य विधींसाठी करत आहेत. हे दुर्दैवच म्हणावं लागले. हे मंदिर या मूर्त्यांसह उभे राहिले असते तर एक भव्य मंदिर चंद्रपूरचे आकर्षण बनले असते.

सध्या अतिक्रमणाने वेढलेल्या आणि अडगळीत पडलेल्या या शिल्पांची वेळीच निगा राखली न गेल्यास पुढची पिढी या वारशाला पारखी होईल, हे नक्की.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
Your Comments
Post Comments