मुंबईतले मानाचे गणपती! Respected Ganpati from mumbai

मुंबईतले मानाचे गणपती!

मुंबईतले मानाचे गणपती!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गणेशोत्सव हा आता केवळ मुंबईकरांचा सण राहिलेला नाही, तर त्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वलय प्राप्त झालंय. सार्वजनिक मंडळांनी केलेली आरास, सजावट पाहण्यासाठी देशी-विदेशी पाहुण्यांची पावलंही मुंबईकडे वळतात. प्रभादेवीचा सिद्धीविनायक म्हणजे तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत. पण गणेशोत्सवाच्या काळात विविध सार्वजनिक मंडळांचे गणपती पाहण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात.

‘लालबाग’चा राजा

१९३१ साली लालबागच्या पेरू चाळीतली बाजारपेठ बंद पडली. बाजारपेठेसाठी नवी जागा मिळाल्यास गणपती बसवू, असा नवस तेव्हा स्थानिक मच्छिमारांनी आणि व्यापाऱ्यांनी केला. त्यानुसार १२ सप्टेंबर १९३४ रोजी सध्याच्या लालबाग मार्केटमध्ये गणपती बसवायला सुरूवात झाली. तोच गणपती आता ‘लालबागचा राजा’ म्हणून प्रसिद्धी पावलाय. मुखदर्शन आणि नवसाच्या रांगेत उसळणारी भाविकांची तोबा गर्दी दरवर्षी वाढतच चाललीय. गेल्यावर्षी भाविकांनी लालबागचा राजाच्या दानपेटीत सुमारे ८ कोटींची रोख रक्कम आणि ३ कोटींचं सोनं दान केलं होतं.

‘गणेशगल्ली’चा राजा

कधीकाळी गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग-परळच्या कष्टकरी, गिरणी कामगारांनी १९२८ मध्ये गणेशगल्लीत गणपती बसवायला सुरूवात केली. १९७७ साली सर्वप्रथम २२ फुटांची उंच गणेशमूर्ती याठिकाणी बसवली गेली आणि ती पाहण्यासाठी भाविकांची रीघ लागली. तेव्हापासून एकापेक्षा एक आकर्षक उंच गणेशमूर्ती हे गणेशगल्लीचं वैशिष्ट्य राहिलंय. यंदाच्या वर्षी गुजरातच्या सोरटी सोमनाथ मंदिराची प्रतिकृती याठिकाणी उभारण्यात आलीय.

‘गिरगाव’चा गणपती

गिरगावच्या केशवजी नाईकांच्या चाळीतला गणपती हा मुंबईतला सर्वात पहिला सार्वजनिक गणपती. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरूवात केल्यानंतर 1893मध्ये पहिल्यांदा केशवजी नाईकांच्या चाळीत सार्वजनिक गणपतीची परंपरा सुरू झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात हा गणपती राजकीय आणि सामाजिक चळवळींचं व्यासपीठ बनलं होतं. यंदा मंडळाचं १२१वं वर्ष असून, यानिमित्तानं १२१ या अंकावर आधारित खास कविता मंडळाच्या स्मरणिकेत प्रकाशित करण्यात येणार आहे.

‘जीएसबी’ गणपती

कर्नाटकातून आलेल्या गौड सारस्वत ब्राह्मण समुदायानं माटुंगा, किंग्ज सर्कल इथं १९५५ पासून सार्वजनिक गणपती बसवायला सुरूवात केली. मुंबईतला सर्वात श्रीमंत गणपती अशी या जीएसबी गणपतीची ओळख आहे. कारण या गणपतीची आभूषणं तर शुद्ध सोन्याची आहेतच, परंतु त्याचे अनेक अवयवही चक्क सोन्यानं बनवलेले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांनी मढवलेल्या या गणपतीच्या मंडळात दरदिवशी १ हजार पूजा बांधल्या जातात. अगदी ३५५ रुपयांपासून ते साडे चार लाख रूपये असा इथल्या पूजाविधीचा आकार असतो.

‘सह्याद्री क्रीडा मंडळा’चा गणपती

टिळकनगरच्या सह्याद्री क्रीडा मंडळाचा गणपती देखील मुंबईकरांचं खास आकर्षण असतो. कुख्यात माफिया डॉन छोटा राजनचा वरदहस्त या मंडळावर आहे, असे बोलले जाते. १९७७ साली सुरू झालेला इथला गणपती भव्य, आकर्षक देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. भारतीय सिनेमाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त यंदा मंडळाच्या मंडपाला स्टुडिओचं स्वरूप आलंय. बॉलिवूड सिनेमांचे छोटेमोठे सेट याठिकाणी उभारण्यात आले असून, गणपतीसोबतच बॉलिवूडच्या तारेतारकांची पोस्टर्स पाहण्यासाठी मुंबईकरांची गर्दी होतेय.

‘तेजुकाया’चा गणपती

लालबागचं आणखी एक लोकप्रिय मंडळ म्हणजे तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. १९४७ पासून या मंडळाची सुरुवात झालीय. हत्तीसारखं गंडस्थळ, सुपासारखे कान आणि लंबोदर अशी २१ फूट उंचीची गणेशमूर्ती हे या मंडळाचं वैशिष्ट्य. दोन वर्षांपूर्वी मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीला अपघात झाला होता. यंदा मंडळानं पहिल्यांदाच सिंहासनाधिष्ठित मूर्ती बसवली असून, २ कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांनी हा गणपती नटलाय.



‘काळाचौकी’ इथला गणपती

काळाचौकीच्या अभ्युदयनगरमधील हाऊसिंग सोसायट्यांनी एकत्रित येऊन १९५७ पासून शहीद भगतसिंग मैदानात गणपती बसवायला सुरूवात केली. सामाजिक आणि राजकीय मुद्यांवर भाष्य करणारे आणि समाजाला मार्गदर्शन करणारे देखावे हे या मंडळाचे खास वैशिष्ट्य. यंदा या मंडळानं इको-फ्रेंडली गणपती बसवलाय. अगदी आरास करण्यासाठी देखील कुठंही प्लास्टिक ऑफ पॅरिसचा वापर करण्यात आलेला नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
Your Comments

hi zee 24 taas, girangaon (lalbaug) madhe lalbaug cha raja, ganesh galli peksha agodar sthapan zalela ganpati mhanje chinchpoklicha chintamani....

  Post CommentsX  
Post Comments