www.24taas.com, झी मीडिया, अलवर योग गुरू बाबा रामदेव आणि भाजपचे उमेदवार महंत चंदनाथ यांच्यातली पैशांची देवाण-घेवाण चव्हाट्यावर आलीय. खुद्द बाबा रामदेवांनीच ही पैशांची देवाण-घेवाणबद्दल माईकसमोर कथन केलीय... पण, अनावधानानं.
त्याचं झालं असं की, बाबा रामदेव अलवर मतदार संघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार दौऱ्यावर होते. यावेळी, संमेलनाला सुरुवात होण्यापूर्वी चंदनाथ आणि बाबा रामदेव स्टेजवर शेजारी शेजारी बसलेले असले होते. त्यांच्या समोरचा माईक बंद होता... यावेळी, महंत यांनी रामदेवांसमोर `प्रचार दौऱ्यादरम्यान धनाची कमतरता भासतेय` अशी आपली अडचण मोकळेपणानं कथन केली.
पण, अचानक बाबा रामदेवांना समोर माईक असल्याचं ध्यानात आलं. म्हणून, खुसपुसत त्यांनी महंत यांना माईक सुरु झाल्यावर धनाबद्दल चकार शब्द न काढण्याविषयी चेतावलं. `इथं या गोष्टी बोलणं बंद कर... तू मूर्ख आहेस` असं म्हणत बाबा रामदेवांनी महंतला चांगलंच झापलं.
यावर महंत ध्यानावर आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्याची लकेर उमटली... बाबा रामदेवही गालातल्या गालात हसताना दिसले. पण, समोरचे माईक बंद असले तरी समोरचा कॅमेरा मात्र सुरूच होता आणि या कॅमेऱ्याचा माईकही... हे दोघांच्याही ध्यानात आलं नाही... आणि त्यांची हा छुपा व्यवहार चव्हाट्यावर आला.
याबद्दल महंत यांना प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी `आम्ही नाही त्यातले...`ची पोझ धारण केली. राजस्थानातील अलवर या मतदारसंघात २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
काँग्रेसनं मात्र तात्काळ मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करत रामदेव आणि महंत यांच्या अटकेची मागणी केलीय. याची निवडणूक आयोगाकडे तक्रारही दाखल करण्यात आलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 18, 2014, 12:43