मोदी वादळानंतर....भावी मुख्यमंत्रीपदाची चर्चा, मनसेत चैतन्य

मोदी वादळानंतर....भावी मुख्यमंत्रीपदाची चर्चा, मनसेत चैतन्य
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज आणि उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या पक्षांमधून नावं येतायत. मात्र दिल्लीत हा प्रयोग यशस्वी करणा-या भाजपमध्ये याबाबत संभ्रम आहे. विनोद तावडेंनी गोपीनाथ मुंडेंचं नाव पुढे केलं असलं, तरी स्वतः मुंडे मात्र बॅकफुटवर आहेत. मुख्यमंत्री महायुतीचा असेल असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी सत्ता आल्यावर महायुतीची चर्चा होऊन मुख्यमंत्री कोण, हे निश्चित होईल, असं सांगितलंय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वतः विधानसभा निवडणुक लढवून मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वकांक्षेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी टोला लगावलाय...शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असल्याचा आत्मविश्वास व्यक्त करताना ते निवडणूक लढणार का याबाबतचा निर्णय काळानुसार घेतला जाईल, आम्हाला कुठलीही घाई नाही अशी भूमिका राऊत यांनी व्यक्त केली...राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वकांक्षेचं शिवसेनेपुढे कुठलंही आव्हान नसल्याचं राऊत म्हणाले.

मोदींच्या त्सुनामीचा काँग्रेस एवढाच मनसेलाही फटका बसला. आणि म्हणूनच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा लढवत जनतेनं कौल दिल्यास राज्याचं नेतृत्व करण्याची घोषणा केली आणि मनसैनिकांमध्येच चैतन्य पसरलयं. राज हे मुख्यमंत्रीपदाचे नवे दावेदार म्हणून चर्चेत आले असले तरी एकूणच विधानसभेसाठी असणा-या सर्वच मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य नावांविषयी जोरदार चर्चा रंगतेय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सायनच्या सभेत ही घोषणा केली आणि मरगळलेल्या मनसे सैनिकांमध्ये जान तर आलीच पण महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या वादळाचा जन्म या घोषणेतून झाला... मोदींच्या लाटेत खचलेल्या पक्ष संघटनेनं मोदी पॅटर्नचाच वापर करण्याचा निर्णय घेतला आणि थेट राज यांनीच विधानसभा निवडणूकांचं नेतृत्व करावं असा आग्रह धरला.

पक्षाला पुन्हा संजीवनी देण्यासाठी राज यांनीही याला अनुकुलता दर्शवली. पण या निमित्तानं भावी मुख्यमंत्री कोण, या चर्चेला अधिक हवा दिली गेली. तशी भाजप-शिवसेनेच्या निमित्तानं ही चर्चा होतीच. भाजपनं गोपीनाथ मुंडे यांचं प्यादं पुढे सरकवलंय... तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री होण्यास अनुकुल असल्याचे संकेत मिळतायत. राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा असलेले अजित पवार हे तर गेल्या अनेक वर्षांपासून या पदासाठी उत्सुक आहेत. काँग्रेसच्या तंबूत नेहमीचीच शांतता असली, तरी सध्यातरी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडेच भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जातंय. या पाच जणांची बलस्थानं काय आणि त्यांचे कच्चे दुवे काय, त्याकडे बघणं म्हणूनच रंजक ठरेल.

राज ठाकरे
राज्यातल्या नवमतदारांना मुख्यमंत्री म्हणून आवडेल, असा राज ठाकरेंचा चेहरा आहे... त्यामुळेच मोदींनी देशात जे केलं, ते राज महाराष्ट्रात घडवू शकतील, असं मनसेच्या थिंक टँकला वाटलं, तर नवल नाही... राज यांची महाराष्ट्राच्या ब्लु प्रिंटची घोषणाही आशादायी आहे.

दुसरीकडे राज यांच्यासमोरची आव्हानंही तेवढीच कडवी आहेत. पक्षात राज यांच्याखालोखाल नेत्यांची दुसरी फळीच नाही. राज यांचं बोलणं आणि त्यांची भाषणं जितकी आक्रमक आणि गर्दी खेचणारी असतात, तसा पक्षात दुसरा नेताच नाही... सभांना येणारे लोक मतदान मनसेला करत नाहीत, हे लोकसभेचा निकालांवरून दिसलंय... मोदींकडे सांगण्यासाठी गुजरातचं मॉडेल होतं... राज यांच्याकडे असलेलं नाशिक मॉडेल फारसं आश्वासक नाही.

उद्धव ठाकरे
किंगमेकर तयार करणा-या `मातोश्री`लाही आता किंग व्हायचे वेध लागलेत, असं दिसतंय.. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्याची शिवसेना नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच लागल्याचं दिसतंय. लोकसभेला शिवसेनेच्या पारड्यात महाराष्ट्रानं भरभरून मतं टाकली हे उद्धव यांचं सर्वात मोठं बलस्थान म्हणता येईल... दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भावनिक आवाहनाचा करिष्माही उद्धव यांच्या बाजूचा आहे. तसंच गेल्या काही वर्षांत उद्धव ठाकरेंनी आपल्या पद्धतीनं वाढवलेली शिवसेनेची ताकदही त्यांच्यासाठी अनुकुल आहे.

असं असलं तरी काही मोठी आव्हानं उद्धव यांच्यासमोर असतील... आणि तीदेखील बरीचशी आप्त-स्वकियांचीच... लोकसभा निवडणुकीतल्या स्वप्नवत यशानंतर भाजपला पुन्हा शतप्रतिशत बनण्याचे वेध लागलेत... शिवसेना हा त्यातला अडसर मानला जाण्याची चिन्हं आहेत... दुसरीकडे उद्धव यांचे चुलत बंधू राज ठाकरेंनी पुन्हा शड्डू ठोकल्यानं मराठी मतांचं विभाजन अटळ आहे... सर्वात महत्वाचं म्हणजे केवळ शहरी चेहरा असल्याचा आक्षेप उद्धव बाळासाहेब ठाकरेंना खोडून काढावा लागेल.

गोपीनाथ मुंडे
कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मुरलेल्या राजकारणाला टक्कर देऊ शकेल, असा भाजपमधला एकमेव नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे... ग्रामीण महाराष्ट्राची जाण, दांडगा जनसंपर्क, जातीच्या समीकरणात चपखल बसणारा असल्यानं मुंडेंचं नाव पक्षातून पुढे केलं जातंय... सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुतीतल्या शिवसेना आणि अन्य पक्षांमध्ये मुंडेंच्या शब्दाला वजन आहे...
मुंडेंच्या अडचणींचा विचार करायचा, तर प्रामुख्यानं आड येईल ते त्यांचं केंद्रीय मंत्रीपद... विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले, की त्यांना मंत्रिपद सांभाळून राज्यात भाजपचं नेतृत्व करण्याची तारेवरची कसरत करावी लागेल... भाजपमध्ये असलेले छुपे गट-तट मोडून काढावे लागतील.

अजित पवार
`पवार` असणं हे अजितदादांचं सर्वात मोठं बलस्थान... त्यांची प्रशासनावर जबर पकड आहे... त्यांचा राजकारणातला दरारा आणि ग्रामीण मतदारांवर असलेली छाप हे त्यांचे महत्त्वाचे प्लसपॉइंट आहेत...
मात्र अजितदादांचा आक्रमकपणा हेच त्यांच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान असेल... गावरान भाषेच्या नादात ते अनेकदा खालची पातळी गाठतात... याचा अनुभव अनेकदा येतो... त्यामुळे पांढरपेशा मतदारांमध्ये त्यांची इमेज तितकीशी चांगली नाही... तसंच त्यांच्या राजकारणाची स्टाईल ही एकूणच काँग्रेसला रुचणारी नाही.

पृथ्वीराज चव्हाण
काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण, हे सांगणं कठीण नव्हे, अशक्यच... पण विधानसभा निवडणुका पृथ्वीबाबांच्या नेतृत्वात लढल्या जातील असं मानलं, तर त्यांचं सर्वात मोठं बलस्थान म्हणजे दिल्लीत असलेलं त्यांचं वजन... शांत संयमी नेतृत्व ही त्यांची जमेची बाजू आहे... स्वच्छ सरकारचा दावा त्यांनी खरा केल्याचं दिसतंय आणि राष्ट्रवादीच्या टगेगिरीलाही त्यांनी चोख उत्तर दिलंय.

मात्र लोकसभा निवडणूकीतला पराभव त्यांच्यावरच शेकवण्यास स्वकीयच आतूर झालेत... तसंच त्यांच्या संथ कारभारावर खुद्द काँग्रेसमधूनही दबक्या आवाजात टीका होते... त्यांच्याकडे आक्रमकपणाचा नसणं हा एरवी गुण मानला जात असला, तरी राजकारणात तो दुर्गुणच.

एकूणच राज्यातल्या पाचही मोठ्या पक्षांचे नेते मुख्यमंत्री होण्यासाठी इच्छुक असल्याचं दिसतंय... मनसे, शिवसेनेला मोदी पॅटर्न वापरण्याची घाई झालीये, तर भाजपमधून मुंडे-फडणवीसांचं पहले आप-पहले आप चाललंय... राष्ट्रवादीत सध्यातरी दादांना चॅलेंज दिसत नाही आणि काँग्रेसबद्दल न बोललेलंच बरं... आता या सगळ्यांमध्ये मतदार राजा कुणाच्या पारड्यात आपलं दान टाकतो, हे येणारा काळच ठरवेल.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 1, 2014, 22:12
First Published: Sunday, June 1, 2014, 22:13
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?