Last Updated: Monday, February 13, 2012, 11:23
www.24taas.com, नाशिक
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिक महानगरपालिकेच्या प्रचाराच्या निमित्ताने नाशिकमध्ये सभा घेतली, आणि पालिका निवडणुकीच्या निमित्ताने एकच एल्गार केला. राज ठाकरे यांनी आज तुफान फटकेबाजी केली, अनेक विषयांना हात घालत राज ठाकरे यांनी भुजबळ, अजित पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली. नाशिकमध्ये सभा असल्याने भुजबळ यांच्यावर खूपच तोंडसुख घेतलं. नाशिकमध्ये राज ठाकरे आणि मनसेचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असल्याने त्यांचा सभेला फार मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती. तर नाशिकमधील, पुण्यातील जमिनी बळकावल्या जात आहेत. त्यामुळे आजच्या भाषणात राज ठाकरे यांनी जमिनी बळकवल्या जात आहे असा आरोप केला. आणि या 'जमिनी घेऊन 'नागडं' नाचायचं आहे का'? असा सवालच त्यांच्या विरोधकांना केला.
- नाशिकमधले राज ठाकरे यांचे 'टार्गेट' छगन भुजबळ
काय करतायेत भुजबळ? नाशिककडे लक्ष आहे का त्याचं? असा प्रश्न विचारूनच राज ठाकरे यांनी भुजबळांना टार्गेट केले. 'मी तुमचं सरंक्षण करणार नाही असंच भुजबळाचं वागणं आहे', अश्या प्रकारची उपहासात्मक टीका देखील केली, तर 'भुजबळ हे तेलगी प्रकरणात अडकले होते', आणि रातोरात परदेशी पळाले', असा गंभीर आरोप देखील केले. 'माझे पुतण्या खासदार कसा होईल, माझा मुलगा आमदार कसा होईल हेच यांनी आयुष्यभर पाहिलं', असं म्हणतं राज ठाकरे यांनी भुजबळ यांच्या घराणेशाहीवर टीका केली. तसचं राष्ट्रवादी पक्षात भुजबळांना कसे वागवले जाते हे सांगण्यासाठी 'ते गृहमंत्री होते पण काढून टाकलं', असा टोला देखील त्यांना हाणला. पण राज ठाकरे यांनी आज भुजबळांवर फारचं गंभीर आरोप केले. 'छगन भुजबळांचे पोलीस कमिशनरांना फोन जातात, तडीपारी रद्द करा', असे आरोप करून राज ठाकरे यांनी खळबळ माजवली.
- राज ठाकरे यांच्या रडारवर 'अजित पवार'
'अजित पवार, छगन भुजबळ आज ज्या प्रकारे वागत आहे त्या प्रकारे पवार साहेब कधी वागले नाही', असं म्हणत राज यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनेच उधळली. 'काय करायचं काय गुंड हाती बाळगून, जमिनी बळकावयाच्या का'?, 'या अजित पवार, भुजबळ यांनी जमिनी बळकावून केलं काय, जमिनी बळकावून काय 'नागडं' नाचायचं आहे का'?, असं म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवारांनावर चांगलीच टीका केली. जळीतकांडातील गुंड राष्ट्रवादीचेच, असं वक्तव्य करून राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला टीकेचं धनी केलं.
- राज यांचा महाराष्ट्र पोलिसांवरचा विश्वास..
माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे, ते गुन्हेगारी संपवतील, पण भुजबळ बदली करतील यांची त्यांना भीती असते, असं म्हणून राज यांनी पोलिसांवर विश्वास व्यक्त केला. 'नाशिकमधील सगळी केबल लाईन बंद, सभा दिसू नये म्हणून भुजबळांचे प्रयत्न होते'. असं म्हणतं त्यांनी भुजबळांवर पुन्हा एकदा टीका केली.
- ...तर सत्ता हातात द्या गोदापार्कचं काय करतो ते पाहा
राज यांनी नाशिकमधील गोदापार्कचं खूपचं कौतुक केलं. 'मी गुजरातला गेलो तर इथं सगळ्यांची टुमटुम सुरू झाली, हे लोकं बाकी परदेशात कशाला जातात'?, 'नाशिकच्या गोदापार्क पासून प्रेरणा घेतली आणि गुजरातमधील साबरमती रिव्हर्र पार्क बनवलं', 'नाशिक महानगरपालिका माझ्या हातात देऊन पाहा फक्त, गोदापार्काचं काय काय करता येईल ते दाखवतो', 'गोदापार्क ही राज ठाकरेंची खाजगी संपत्ती नव्हे', असं म्हणतं राज यांनी नाशिककरांना भावनिकदृष्ट्या जिंकण्याचा प्रयत्न केलं.
- आघाडीविरूद्ध राज यांचा एल्गार..
राज यांनी निवडणुकी निमित्त आघाडीवर टीका केली. 'आघाडीच्या हातात राज्याची सत्ता आहे आणि तरीही महानगरपालिका हवीये यांना', अजित पवार विलक्षण आहेत, पालिका आमच्या हातात द्या, तरच विकास करू. काय दादागिरी यांची अरे नका करू विकास, सत्ता आमच्याच हातात येणार आहेट, नाशिक पूर्वी किती सुंदर होते, पूर्वी नाशिकचे एक आयुक्त होते, 'भोगे' काय यांची आडनावं, असं म्हणून प्रशासकिय अधिकाऱ्यांवर देखील टीका केली. तर 'मला तुमच्या टेंडरमध्ये काही एक रस नाही, फक्त विकास हवा', असं देखील राज यांनी स्पष्ट केले. 'आमचे महापौर फिरतात असतात याच्या त्याच्यामागे, हे कसले महापौर लेचेपेचे' अशी टीकादेखील राज यांनी केली.
- तुम्हीच म्हणालं 'की करून दाखवलं'....
राज यांनी नागरिकांना आव्हान केलं की, 'मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या पालिका माझ्या हातात देऊन बघा फक्त', तुम्हीच म्हणालं 'की करून दाखवलं', जागोजागी होर्डिंग लावण्याची गरज नाही. असं म्हणतं युतीची थट्टा केली. 'राज्याची सत्ता देऊन पाहा फक्त माझ्या हातात, जळीतकांड तर बाजूलाच आगपेटी सुद्धा पेटू देणार नाही'
- भुजबळांनी 'नटरंग' सिनेमात असायला हवं होतं...
राज ठाकरे यांनी आज भुजबळांना टीकेचं लक्ष्य केले होते. 'छगन भुजबळ येतील वाकडं तोंड करून येतील मतं मागायला त्यांना मतं देऊ नका', असं म्हणून त्यांनी नाशिककरांना भुजबळांविरोधी चितवले हे नक्की. तर 'भुजबळांनी 'नटरंग' सिनेमात असायला हवं होतं', असं म्हणून त्यांची हुबेहुब नक्कल देखील केली. अशाप्रकारे राज यांनी नाशिकच्या सभेत एकच एल्गार केला आहे हे दिसून आले.
First Published: Monday, February 13, 2012, 11:23
First Published: Monday, February 13, 2012, 11:23