www.24taas.com, पुणे पुण्यात मतदानाच्या दिवशी अडथळा निर्माण केल्यामुळं माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे यांना पोलिसांनी अटक केलीय. बागवे हे उमेदवार होते तसंच त्यांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.त्याच्याविरोधात खडक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार आज अविनाश बागवेंसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली.
अविनाश बागवे नवनिर्वाचित नगरसेवकही आहेत. मतदानाच्या दिवशी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या प्रभाग क्रमांक ६० (जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम, कासेवाडी) येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत बांधलेल्या राजीव गांधी कॉम्प्लेक्स येथे मतदान केंद्र नकोत, अशी मागणी कॉंग्रेसच्या सर्व विरोधी उमेदवारांनी निवडणुकीपूर्वी केली होती. या सोसायटीचे अध्यक्ष अविनाश बागवे असल्यामुळे त्यांनी ही तक्रार नोंदविली होती.
त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. त्या वेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता सहायक पोलीस आयुक्त रणजीत धुरे यांच्या पथकाने तेथील कार्यकर्त्यांना हटविले. त्या वेळी बागवे यांना मारहाण झाल्याचे वृत्त पसरले होते. त्यामुळे आजूबाजूचे कार्यकर्तेही त्या भागाकडे वळाले. शेवटी पोलिसांना त्या भागातील रस्त्यांवर अडथळे उभे करून वाहने थांबवावी लागली होती.
निवडणुकीसाठी नियुक्त केलेले अधिकारी, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी वारंवार विनंती करूनही अविनाश बागवे यांनी ती जागा सोडण्यास नकार दिला होता. विरोधी उमेदवारांनी बागवे यांच्या उपस्थितीबाबत आक्षेप घेतला होता. याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले आहे. बागवे व अन्य दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती धुरे यांनी दिली होती.
First Published: Tuesday, February 21, 2012, 18:49