रिक्षाचालक होऊ नका मालक... - Marathi News 24taas.com

रिक्षाचालक होऊ नका मालक...


अतुल सरपोतदार,  नेते, मनसे 
 
मनसे म्हणजे राडा इतकंच समीकरण झालं आहे किंबहुना,  अशाच काहीतरी वावड्या याबाबत नेहमीच उठत असतात. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच वाईट गोष्टींविरोधात आवाज उठवत आली आहे आणि यापुढेही उठवणारच. त्यासाठी मनसे स्टाइलने आंदोलनंही संपूर्ण महाराष्ट्रभर केली जातील, मराठी लोकांच्या न्याय-हक्कासांठी मनसे आपला लढा नेहमीच चालू ठेवेल.
 
रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यातच भर म्हणजे कामगारांचे नेते शरद राव यांनी आपला पाठिंबा या रिक्षाचालकांना देऊन साऱ्या मुंबईकरांना वेठीस धरले आहे. या मुजोर रिक्षाचालकांच्या मुजोरीस कुठेतरी आळा हा घातला गेलाच पाहिजे. अनेक रिक्षाचालक हे स्त्रिया, आबालवृद्धांशी बेशिस्त वर्तन करतात. ज्या ग्राहकांच्या जीवावर या रिक्षाचालकांचं घर चालतं त्याच्याचं जीवावर उठणाऱ्या या मुजोरखोरांना त्यांची जागा दाखविण्यांची आज खरी वेळ आली आहे.
 
राजकीय दृष्टीकोनातून विचार करता आता अनेक  पक्षांचे नेते या आंदोलनामध्ये उड्या घेत आहेत. त्यामुळेच या आंदोलनाला राजकारणाचा नवा रंग चढू लागला आहे, मा. राज ठाकरे यांनी सुरू केलेला हा लढा  हा आज मुंबईतील जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरूद्ध केला गेलेला एल्गारच आहे. मनसेचं रिक्षाचालकांना एकच सांगणं आहे या जनतेला कधीही नाकारू  नका  नाहीतर ही जनताच तुमच्या मुजोरीला मोडून काढेल. हो मोडूनच काढेल. कारण की ही जनता महागाई, घोटाळे या साऱ्या गोष्टीपासून पिचलेली आहे. त्यांचा उद्रेक होण्यासाठी वेळ लागणार नाही.
 

रिक्षाचालक हे मीटरमध्ये फेरफार करतात याबाबत कारवाई करणं हे सरकारचं काम आहे. मात्र या उदासिन सरकारची काय सांगावी व्यथा.. त्यासाठीच मनसेचा मराठी दणका हा दिला पाहिजेच असा आदेशच राज साहेबांनी दिला आहे. रिक्षाचालकांच्या कृष्णकृत्यांना अबू आझमी सारख्या भेकड लोकांचा पाठिंबा असतो. त्यामुळेच या रिक्षाचालकांची भीड चेपते. त्यातूनच सामान्य लोकांवर हल्ले करणे,  मारहाण करणे यासारखे प्रकार घडतात.  यासगळ्या माज चढलेल्या रिक्षाचालकांना एकच सागणं आहे.  या मुंबईत  मराठी माणसाचा वाटेला जाऊ नका.
 
२५ हजार दर महिना मिळावा, या रिक्षाचालकांनी केलेल्या मागणीला आमचा विरोध नाही. वाढत्या महागाईचा फटका हा सगळ्यांच बसला आहे. परंतु जवळचं भाडं नाकारणं आणि लांबची भाडी घेणे या गोष्टी अजिबात खपवून घेतल्या जाणार नाही. मा. राज साहेबांनी आदेश दिल्यानंतर काही ठिकाणी  मुजोर रिक्षाचालकांना आमचा मनसे दणका दिसून आला. मात्र, त्यानंतर अनेकांनी छातीठोकपणे 'ते' आपणच केले असा गवगवा मात्र जरूर केला.
 
शब्दांकन – रोहित गोळे
 
 

First Published: Saturday, October 22, 2011, 15:53


comments powered by Disqus