दसरा मेळावा की फसवा मेळावा ? - Marathi News 24taas.com

दसरा मेळावा की फसवा मेळावा ?

जनार्दन चांदूरकर, प्रवक्ते, काँग्रेस
 
शिवसेनचा दसरा मेळावा पार पडला, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा एकदा अनेक विषयांना तोंड  फोडलं हे मात्र नक्की. वयाच्या 85व्या वर्षीही बाळासाहेबांचा भाषणाचा नूर काही पालटलेला नाही. कारण की, आज ही तितक्याच शिवराळ भाषेमध्ये बाळासाहेबांनी भाषण केले, कॉंग्रेस हे त्यांचे नेहमीच टार्गेट राहिले आहे. आजतर अण्णांना देखील त्यांनी सोडलं नाही. शिवसेना आणि शिवसैनिक यांनी आजपर्यंत फक्त हिंसेचाच मार्ग अवलंबलेला आहे. दसरा मेळाव्यात फक्त हास्याची कारंजी उडवली जातात. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मुंबईकरांना अनेक अमिष ही दाखवून शिवसेना ही सामान्यांच्या तोंडाला पानेच पुसत आली आहे. त्यामुळेच हा दसरा मेळावा होता की फसवा मेळावा अशी शंका मात्र नक्कीच येते.
 
आजही उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांना दसरा मेळाव्यासाठी आणावे लागते हीच खरी शोकांतिका आहे. यावरूनच कळून येते की शिवसेनेची ताकद काय आहे. बाळासाहेबांच्या जीवावर सत्ता मिळविण्याचा  अजून किती केविलवाणा प्रयत्न शिवसेना करणार आहे. त्याचप्रमाणे बाळासाहेबांनी केलेले भाषण पूर्णपणे काल्पिनक असल्याचे जाणवते, भाषणात फक्त भावनिक मुद्दयांनाच हात घातला गेला. निवडणूकीचा तोंडावर आजच त्यांना कोळी, भंडारी समाज आठवतो का ?  जातीचे राजकारण करताना एका विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी बाळासाहेबांनी बाबासाहेब आंबेडकरांचा नावाला केलेला विरोध, त्याचप्रमाणे 'मराठवाडा विद्यापीठाचे नामातंर केल्याने काय फरक पडला?' अशी विधाने करून बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान व्यक्तीचा अपमानच केला जात आहे.
 
गेली अनेक वर्ष काँग्रेसने दादर नामांतर आणि इंदू मिलच्या जागेत बाबासाहेबांचे भव्य स्मारक असावे अशी मागणी लावून धरली होती. त्यामुळे काँग्रेस हा नेहमीच एक धर्मनिरपेक्ष पक्ष राहीला आहे. माझ्या मते हळूहळू शिवसेनेच्या भूमिका ही बदलत जात आहे. तसंच सी-लिंकला असणाऱ्या राजीव गांधीचा नावाला विरोध करत आहे. त्यामुळे यांचा साऱ्याच नावाला विरोध आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेनी नेहमीप्रमाणेची आपली वृत्ती दाखवली आहे. अण्णा हजारे यांना सभेत समर्थन दिले जाते आणि नंतर म्हटले जाते की 'आमच्या वाटेला जाऊ नका' ही अशी दुटप्पी राजकारणं शिवसेना गेली कित्येक वर्षी खेळत आहे.
 
मुंबईत गेली अनेक वर्षं मुंबईत सत्तेवर आहे, तरी सुद्धा बाळासाहेबांनी खड्ड्याच्या विषयावर सोयीस्कररित्या शिवसेनेला पाठीशी घातले त्यांना खरंच मुंबईतील खड्ड्यांपेक्षा सिंधुदुर्गातील खड्ड्यांचीच जास्त चिंता होती असे दिसून आलं. काँग्रेस ही आपल्या भूमिकेवर नेहमीच ठाम असते. वड्याचे तेल वांग्यावर काढण्याची शिवसेनेची सवय नेहमीचीच आहे.
 
शब्दांकन – रोहित गोळे

First Published: Saturday, October 22, 2011, 15:19


comments powered by Disqus