Last Updated: Wednesday, December 28, 2011, 15:52
हरिश रोग्ये, काँग्रेस प्रवक्ते प्रशांत भूषण काश्मीर संदर्भात सहज ओघात बोलले तर समजू शकलो असतो. परंतु आता ते पुन्हा जाणीवपूर्वक काश्मीर प्रकरणी बोलून चूक करतात, याला काय म्हणायचं? ‘टीम अण्णां’च्या कोअर कमिटीने त्यांच्या या विधानाचा निषेध केलेला नाही. अण्णा हजारे हे केवळ काँग्रेसलाच ‘टार्गेट’ करत आहेत. ही त्यांची भूमिका चुकीची आहे.
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना टीम अण्णातील सदस्य वेड्याच्या इस्पितळात ठेवण्याची भाषा करीत आहेत. पण काश्मीर प्रकरणी वादग्रस्त विधान करून देशात फूट पाडण्याचे काम करणारे प्रशांत भूषण आणि अण्णा हे संसदेपेक्षा मोठे आहेत, असे म्हणणाऱ्या अरविंद केजरीवाल या विद्वानांना कोणत्या वेड्यांच्या इस्पितळात पाठवायचे. ‘लोकपाल’वरुन दिल्लीत जल्लोष केला. सरकार हरले, काँग्रेसचा पराभव झाला, असे वातावरण तयार केले. ही बाब चुकीची आहे.
अण्णांच्या भ्रष्टाचार आंदोलनाचे आम्ही स्वागत करतो. परंतु, अण्णा हे काँग्रेसलाच ‘टार्गेट’ करत आहेत. त्यांच्या या नकारात्मक भूमिकेमुळे जनतेची दिशाभूल होत आहे. अण्णांची भूमिका सकारात्मक असायला हवी. 'टीम अण्णा' मध्ये एकमत नाही. एकमत नसल्याने त्यांच्या टीममध्ये फूट पडते आहे. या टीममधून आधी स्वामी अग्निवेश गेलेत, आता ‘भूषण’ यांच्यावर वेळ आहे. निदान कोअर कमिटीने एकमत तयार करुन बोलले पाहीजे. मग स्पष्टीकरण देण्याची वेळ येणार नाही. आम्ही त्यांची विश्वासार्हता ठरवणार नाही. त्यांची त्यांनीच गमावली आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर किरण बेदींनी केलेला तमाशा पाहिला. यावरुन जनताच त्यांची विश्वासार्हता ठरवेल.
अण्णांच्या टीममध्ये गेल्या तीन-चार महिन्यांपासून गोंधळाची परिस्थिती आहे. ती भूषण यांच्या वक्त्यांवरुन दिसून येते. अण्णा जनतेची जाणीवपूर्वक दिशाभूल करीत आहेत. आमचं आंदोलन कोणत्या एका राजकीय पक्षाविरुद्ध नाही, असे अण्णा सांगत होते. परंतु हिसारमध्ये काँग्रेसविरोधात प्रचार केला. काँग्रेसविरोधी वातावरण उभं केलं गेलं, याला काय म्हणायचे?
शब्दांकन- सुरेंद्र गांगण
First Published: Wednesday, December 28, 2011, 15:52