छटपूजा की राजकारण - Marathi News 24taas.com

छटपूजा की राजकारण

राम कदम
 
गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर भारतीय नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वादंग माजलेला आहे. त्या संदर्भात राज ठाकरे योग्य वेळ येताच आपल्या खास आक्रमक पद्धतीनं आपलं मत लोकांसमोर मांडतील. खरतरं छटपूजेच्या बाबतीत कोणाचीही हरकत असण्याचे काही कारण नाही. छटपूजा म्हणजे देवीची आराधना आणि सूर्याला अर्ध्य अर्पण करुन केलेली आराधना आहे आणि त्याला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही. पण याबाबतीतलं वास्तव लक्षात घेण्याजोगं आहे.
 
छटपूजा ही उत्तर प्रदेशातील फक्त तीन ते चार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. छटपूजा हा बिहारी सण आहे आणि तो बिहारमध्येच मोठ्या प्रमाणार साजरा केला जातो. उत्तर प्रदेशचे जे जिल्हे बिहार सिमेलगत आहेत तिथेच छटपूजा केली जाते. कृपाशंकर सिंह आणि अबु आसिम आझमी ज्या जिल्ह्यातून आले आहेत तिथेही छटपूजेचं आयोजन करण्यात येत नाही. पण गेल्या काही दिवसांमध्ये संकूचित राजकारणासाठी या उत्सावाचा वापर केला जातो हे अत्यंतिक दुर्दैवाचे आहे. आणि हे सर्व महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर करण्यात येतं हे उघड आहे. छटपूजा संपल्यानंतर महिला वर्गासमोर बिभत्स असे नाच सादर केले जातात हे सर्वस्वी चुकीचं असंच आहे. उत्तर भारतीय नेते देवाच्या पूजेचा वापर आपल्या राजकारणासाठी करतात.
 
देशात दर मिनिटाला ५१ बालकं जन्माला येतात त्यापैकी ११ बालके उत्तर प्रदेशमध्ये जन्मतात. आज मुंबई आणि महाराष्ट्राच्या परप्रांतियांना सामावून घेण्याच्या सर्व मर्यादा संपल्या आहेत आणि आता इथे जागा उरली नाही असं सांगितलं तर काय चुकलं?  खरतरं राजकारण विकासावर केंद्रित व्हायला पाहिजे. आज दिवाळी साजरी होताना राज्यातील ४२,०० खेड्यांमध्ये ६ ते ८ तास लोडशेडिंगमुळे अंधार होता. राज्यात आजवर २१ मुख्यमंत्री आणि १६ सरकार होऊन गेली पण विकास झाला का ?
रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मारहाण करतात हे खरं आहे पण त्यामागचं कारण समजावून घ्या. एकाद्या वध्द महिलेला जर रिक्षा किंवा टॅक्सी चालक घेऊन जायाला नकार देत असेल तर त्याला कळेल अशा भाषेतच आम्ही उत्तर देतो. मनसे रस्त्यावर उतरली ती सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठीच हे लक्षात घेतलं पाहिजे.
कृपाशंकर सिंग आर्वजून मराठी बोलतात त्यांचे मी जाहीरपणे अभिनंदन करतो. पण अबु आसिम आझमी ज्या महाराष्ट्रातून विधानसभेवर निवडून गेले ज्या राज्याने त्यांना मोठं केलं जिथे त्यांनी संपत्ती कमावली तिथली भाषा बोलायचं ते जाणीवपूर्वक टाळतात. आजही महाराष्ट्राने अनेक उत्तर भारतीयांना मोठं केलं, त्यांना भरभरून दिलं पण ते या राज्याविषयी कृतज्ञेची भावना बाळगत नाही. अबु आसिम आझमी सारखी लोकं गुंडांची बाजू घेतात त्याचं वाईट वाटतं.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांवर, त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी आंदोलनं केली तडीपारीचा सामना केला. राज ठाकरेंवरही आजमितीला ९० हून अधिक खटले दाखल करण्यात आले आहेत. पण मनसेने कायम लोकांच्या प्रश्नांची सोडवणुक जेंव्हा सामजस्याच्या मार्गाने झाली नाही तेंव्हाच आक्रमक भूमिका घेतली.
 

First Published: Wednesday, November 2, 2011, 18:00


comments powered by Disqus