कोकणात ‘गुंडा’राज - Marathi News 24taas.com

कोकणात ‘गुंडा’राज

ब्रिगेडीयर सुधीर सावंत
सिंधुदुर्ग जिल्ह्यासारखं दहशतीचे वातावरण संपूर्ण राज्यात कोठेही नाही. मी एका उद्योजकाला सिंधूदुर्गात गुंतवणूक का करत नाही असं विचारलं तेव्हा ते म्हणाले की तिथल्या गुंडाराजमुळे भीती वाटते. मी संपूर्ण  राज्यात फिरतो पण इतकी भयाण परिस्थिती कुठेही नाही.
मी एक अनुभव सांगतो. नारायण राणेंच्या समर्थकांनी न्यायालयावरच एक दिवस हल्ला चढवला आणि खुद्द न्यायधीश कम्पाउंडवरुन उडी मारून पळून  गेले. दुसऱ्या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आले आणि त्यांनी या सर्वांना सोडून द्या असं
सांगितलं. आज पोलीस दल निष्क्रीय झाले आहे, सर्वसामान्य माणसाला कोणत्याही प्रकारचं संरक्षण राहिलेलं नाही.
नारायण राणेंमुळे काँग्रेसची ताकद कोकणात वाढलीय का हा अभ्यासाचा प्रश्न आहे. नारायण राणे आणि भास्कर जाधव यांच्यातला हा संघर्ष राजकीय वर्चस्वासाठी असेल तर त्यासाठी लोकप्रियता हा निकष असला  पाहिजे. मारामारी किंवा राडेबाजीने वर्चस्व निर्माण करुन नव्हे.
माझे स्वत:चे वडील पंधरा वर्षे आमदार होते. तेव्हाची राजकीय संस्कृती वेगळी होती. आताच्या आणि  तेव्हाच्या परिस्थिती फरक आहे. आता राजकीय विरोधक म्हणजे शत्रू त्याला संपवलं पाहिजे अशी भावना असते. राजकीय विरोधक वैयक्तिक शत्रू झाला आहे. माझ्या वडिलांच्या काळात व्यक्तिगत संबंध जपले जात,आता तसं नाही.
राज्यात राजकीय क्षेत्रात मॅच फिक्सिंगचा काळ आला आहे. विलासराव देशमुखांच्या मुलाला निवडून आणण्यात गोपीनाथराव मुंडेंनी हातभार लावला. गोपीनाथ मुंडेंच्या मुलीला निवडून आण्ण्यासाठी देशमुखांनी जोर लावला. सर्वसामान्य कार्यकर्त्याला कोण विचारतो आजकाल. सर्वसामान्य कार्यकर्ता राजकीय संघर्षात भरडला जातो.
पक्षासाठी लढणारा जीवाचे रान करणारा कार्यकर्ता हाकनाक मारला जातो. सर्व सत्तास्थाने आपल्या घरात  कुटुंबात राहावी यासाठी आज राजकीय नेते प्रयत्न करतात. प्रत्येक पक्षात घराणेशाही, सरंजामशाही उदयाला आली आहे. राजकारणात प्रत्येक जिल्ह्यात नवे सुभेदार निर्माण झाले आहेत.
आजच्या राजकीय व्यवस्थेचे सर्वात मोठे लाभधारक राजकीय नेते आहेत. ही व्यवस्था जोवर बदलली जात नाही तोवर परिस्थितीत काहीही  फरक पडणार नाही. सर्वसामान्य जनतेनेच राजकीय नेत्यांना वठणीवर आणलं पाहिजे. आज कार्यकर्ता गुंड असो, मटका किंग असो की दारुचे गुत्ते चालवणारा असो त्याला पोसलं जातं त्यांच्यावर राजकीय नेत्यांचा कोणताही निर्बंध असत नाही. आज कोणताही नेता किंवा राजकीय पक्ष सिद्धांतावर आधारीत राजकारण करत नाही.
 

First Published: Tuesday, November 8, 2011, 17:09


comments powered by Disqus