शांत झोप घ्या... अन् उत्साहानं कामाला लागा! for take a good nap

शांत झोप घ्या... अन् उत्साहानं कामाला लागा!

शांत झोप घ्या... अन् उत्साहानं कामाला लागा!
www.24taas.com, मुंबई

खूप कंटाळा आलाय... अंग भरून आलंय... पण, डोळे मिटत नाहीत, झोप पूर्ण होत नाही... अचानक जाग येते... अशा कित्येक तक्रारींना अनेक जण सामोरे जात असतात. चला तर, आज पाहुयात... याच समस्यांवर काही सोपे उपाय...

झोप न येणं हा प्रत्येकाने केव्हा ना केव्हा घेतलेला अनुभव असतोच. गंभीर समस्या असताना, दु:खद, धक्कादायक घटनेनंतर, वेदना होत असताना बहुतेक वेळा झोप येत नाही असा आपलाही अनुभव असेलच. पण तो प्रासंगिक असतो व फार काळ लांबत नाही. याशिवाय शरिरांतर्गत काही कारणांमुळे, काही बाह्य कारणांमुळे निद्रानाश होऊ शकतो. तर कधी काहीही संभाव्य कारण नसतानाही तो होतो. असं म्हणतात की जगाच्या लोकसंख्येच्या निम्मे लोक तरी निद्रानाशाने त्रस्त आहेत. त्याचे प्रमाण पाश्चात्त्य देशात जास्त आहे. तसेच ते शहरी भागात जास्त आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात. निद्रानाशावर झोपेची गोळी म्हणून वापरात येणारी औषधं ही सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या औषधांच्या यादीत दुसरे स्थान पटकावतात. बऱ्याच वेळा रुग्ण स्वत:च, कोणाही तज्ज्ञांचा सल्ला न घेता ती घेत असतात. याचेही गंभीर दुष्परिणाम नंतर दिसतात. त्यामुळे असे काहीही न करता, त्यावर करता येण्यासारखे साधे सोपे उपाय काय ते आपण बघू. या उपायांना इंग्रजीत स्लीप हायजीन` असं म्हटलं जातं.

निद्रानाश टाळण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सवयी

> ठरलेल्या वेळी झोपणे. ठरलेल्या वेळी उठणे.

> शय्या ही उबदार, सुखकारक असावी, स्वच्छ असावी, परिसर शांत असावा.

> झोपण्यापूर्वी चहा, कॉफी, तंबाखू किंवा इतर नशेचे पदार्थ सेवन करू नये. त्यातून मेंदूला उत्तेजना येते व निद्रानाश होऊ शकतो.

> झोपण्यापूर्वी खूप पाणी पिऊ नये.

> झोपताना सैलसर कपडे घालावे. तंग कपडे घालू नयेत.

> अभ्यास करणे, जेवणे, खेळणे अशा इतर गोष्टींसाठी शय्येचा उपयोग करू नये.

> चिंता निर्माण करणारे विषय टाळावेत.

> झोपण्यापूर्वी चापून खाऊ नये, हलकं खावं.

> झोपण्याच्या आधी फार थकवा आणणारा शारीरिक व्यायाम करू नये.

> झोपण्याअगोदर टीव्ही पाहणं टाळावं, त्यामुळे झोपेची वेळ लांबते किंवा झोप येत नाही.

> झोपण्यापूर्वी गरम / कोमट पाण्याने आंघोळ केल्यास झोप येण्यास मदत होते.

> झोपण्याआधी मंद प्रसन्न संगीत ऐकू शकता

> झोपण्यापूर्वी गोडसर दूध प्राशन केल्यानेही झोपेचा स्तर उंचावतो असा काही जणांचा अनुभव आहे.

First Published: Wednesday, April 10, 2013, 08:20


comments powered by Disqus