भारतीयांची फुफ्फुसं अकार्यक्षम! Indians having Most inefficient lungs!

भारतीयांची फुफ्फुसं अकार्यक्षम!

भारतीयांची फुफ्फुसं अकार्यक्षम!
www.24taas.com , झी मीडिया, पुणे

भारतीयांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता ही युरोपियन नागरिकांच्या फुफुसांच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी असल्याचं नुकतंच एका अभ्यासात निष्पन्न झालंय. केवळ एवढंच नाही तर जगभरातील १७ देशांतील नागरिकांच्या फुफ्फुसांच्या तुलनेत भारतीयांची फुफ्फुसं ही सर्वाधिक अकार्यक्षम असल्याचं धक्कादायक वास्तव एका कॅनेडियन सर्वेक्षणात पुढं आलंय.

भारताच्या प्रमुख शहरांमधील हवामान तिथल्या नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं पुन्हा एकदा निष्पन्न झालंय. पुण्यातील चेस्ट रिसर्च फाउंडेशननं नुकतंच देशातील काश्मीर, जयपूर, कोलकाता, हैदराबाद आणि पुणे या पाच शहरांमधील १० हजार निर्व्यसनी नागरिकांच्या फुफुसांची तपासणी केली. या तपासणीत युरोपियन नागरिकांच्या तुलनेत भारतीयांची फुफ्फुसं ३० टक्क्यांनी कमकुवत असल्याचं समोर आलंय. इतकंच नाही तर भारतीयांची फुफ्फुसं जगातील इतर देशांमधील नागरिकांपेक्षा सर्वाधिक कमकुवत असल्याचं कॅनेडियन संस्थेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात समोर आलंय.

कॅनेडियन संस्थेनं जगातील १७ देशांमध्ये हे सर्वेक्षण केलं होतं. यामध्ये यूरोपातील देशांबरोबर आशियाई देशांचाही समावेश होता. ही तपासणी निर्व्यसनी नागरिकांमध्ये केल्यामुळं वाढतं वायूप्रदूषण या अकार्यक्षमतेला जबाबदार असल्याचं तज्ञां्यचं मत आहे.

तज्ज्ञांनुसार २५ वर्षापूर्वीही भारतात असाच एक सर्व्हे घेण्यात आला. त्यावेळी युरोपियांच्या तुलनेत भारतीयांचं फुफ्फुस केवळ १० टक्के कमकुवत होतं. मात्र गेल्या २५ वर्षात या टक्केवारीचं वाढलेलं प्रमाण भारतीयांच्या आरोग्याच्या दृष्टीनं चिंताजनक आहे.


सध्या वाढत जाणारं वायूप्रदूषण यामागील प्रमुख कारण आहे. प्रदूषणात भर घालणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. १९९७ मध्ये देशातील एकूण वाहनांची संख्या ३७.२ मिलिअन एवढी होती. हीच संख्या २०१२मध्ये १०० मिलियनवर पोचलीय. १९५७ साली ही संख्या फक्त ३ लाख एवढी होती.

वाहनांची ही वाढती संख्या भारतीयांच्या आरोग्यासाठी घातक ठरतेय. वाहनांची वाढती संख्या आणि दुसरीकडे शरीराची ढासळणारी कार्यक्षमता यामुळं जगात सर्वात जास्त तरुण असणारा देश आरोग्याच्या दृष्टीनं मात्र पिछाडीवर आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, September 4, 2013, 10:53


comments powered by Disqus