Last Updated: Wednesday, July 17, 2013, 08:20
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई ‘आशु... मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय’… तेजसनं आशुला हाक मारल्यानंतर ती बाहेर आली. ‘हा... बोल आता’ ती म्हणाली. ‘मी विचार करतोय की जॉब बदलावा’ असं तेजूनं म्हटल्याबरोबर पुढचं काहीही ऐकून न घेता आशुनं त्याला नवीन जॉबच्या फंदात पडू नको, नाहीतर आपल्याला संसारात काय काय झेलावं लागेल.. काय काय अडचणी येतील याचा पाढाच वाचणं सुरू केलं. त्यावर तेजू जाम चिडला. ‘जाऊ दे, तुझ्याशी तर बोलणचं व्यर्थ आहे. माझा मला काय निर्णय घ्यायचा तो मी घेईल’ असं तेजूनं म्हटल्यानंतर आशु थंडच पडली. पण, तिला तिची चूकही लगेचच उमजून आली आणि पहिल्यांदा त्याचं म्हणणं पूर्ण ऐकायला हवं होतं असं वाटलं. पण, आता काही उपयोग नव्हता...
अशाच काही गोष्टी आपल्याबाबतीतही घडून येत असतील. पण, तुम्ही समोरच्याचं काहीही न ऐकून घेता नकारघंटा सुरू केली तर असंच होईल ना.
नकारघंटेचा बेसूर सूर… ‘किती महत्त्वाचं बोलायचं होतं मला पण, आशूनं साधं ऐकूनही घेतलं नाही’ असं मनातच घोळवत तेजू बाहेर पडला होता. पती-पत्नीच्या नात्यातही ऐकमेकांचं म्हणणं ऐकून घेण्यात कुठेतरी अडथळा आला होता. त्यामुळे तेजू नाराज होता.
अशा वेळी तुम्ही पहिल्यांदा केवळ शांत राहून समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं. जर, एखादी व्यक्ती आपलं मत व्यक्त करत असेल तर त्याला मध्येच थांबवू नका. यामुळे तुमचे संबंध बिघडू शकतात.
दुसऱ्यांना बोलण्याची संधी द्या तुमच्याशी कोणतीही खास गोष्ट शेअर करताना तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीलाही तीनदा विचार करावा लागत असेल तर तुम्ही कुठेतरी कमी पडत आहात हे समजून घ्या. त्याला कमीपणा वाटेल असं वर्तन तुम्ही चारचौघांत करत असाल तर त्यामुळेही तुमच्या संबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. अशावेळी त्या व्यक्तीला बोलण्याची संधी द्या... तुम्हाला पटत नसेल तर नंतर त्याला तसं समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. पण, आपलं मत त्या व्यक्तीवर लादू नका.
नेहमी नेहमी नकार टाळा ‘याला कुठलीही गोष्ट सांगितली तरी त्याचा नंदीबैल झालेला असतो... तोही नकारार्थी’ अशी वाक्यही तुम्हाला ऐकायला मिळू शकतात. नेहमी नेहमी कोणत्याही गोष्टीला पहिल्यांदाच नकार दर्शवल्यानं लोकांच्या मनात तुमची अशी इमेज बनू शकते. त्यामुळे एखादी गोष्ट पूर्ण समजून घेतल्याशिवाय आणि कारणाशिवाय प्रत्येक गोष्टीला पहिल्यांदाच नकार देणं टाळा आणि कधीतरी ‘रिस्क’ही घेऊ शकता.
नकाराला नकार... केवळ एखाद्याला नकार द्यायचाय, अडथळा घालायचाय म्हणून नकार देऊ नका. ‘त्यानं माझं ऐकलं नाही मग, मी त्याचं का ऐकून घेऊ?’ या भूमिकेमुळे संबंधातील तणाव आणखीनच वाढत जाण्याची शक्यता असते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, July 17, 2013, 08:19