अनिल अंबानी सीबीआय कोर्टात!, 2G case: Anil Ambani deposes as CBI witness in court

अनिल अंबानी सीबीआय कोर्टात!

अनिल अंबानी सीबीआय कोर्टात!
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली

२जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी खटल्याची साक्ष द्यायला रिलायंस एडीएजीचे अध्यक्ष अनिल अंबानी सीबीआय कोर्टात पोहोचले. अंबानींच्या साक्षीसाठी आजची तारीख निश्चित करण्यात आली होती.

तर दुसरीकडे केद्रीय अन्वेंशन विभागानं टीना अंबानी यांना वैयक्तिक सुनावणीतून सूट देण्यासंदर्भातला निर्णय दिल्लीतल्या विशेष कोर्टावर सोडलाय. सीबीआयनं विशेष न्यायाधिश ओ. पी. सैनी यांच्या कोर्टात आपल्या जबाबात याप्रकरणी न्यायालयानंच योग्य तो निर्णय घ्यावा, असं म्हटलं होतं. त्यानुसारच आता टीना अंबानींबाबत योग्य तो निर्णय कोर्ट घेईल. टीना अंबानी यांना २३ ऑगस्टला साक्ष देण्यासाठी कोर्टासमोर हजर राहायचं आहे. त्यांनी वैयक्तिक सुनावणीतून सूट मागितली आहे.

याच प्रकरणी फिर्यादी पक्षाचे साक्षीदार म्हणून अनिल अंबानी आज कोर्टात दाखल झालेत. आज कोर्टात हजर राहण्यापासून आपल्याला सूट मिळण्यासंदर्भात अनिल अंबानी यांनीही विनंती केली होती. जर हायकोर्ट २जी प्रकरणी सुनावणी संदर्भातल्या प्रतिबंधावरील आपले आदेश मागे घेण्याची मागणी करत असेल, तरच अंबानी यांच्या अर्जावर विचार केला जाईल, असं कोर्टानं स्पष्ट केलं होतं.

शिवाय साक्षीदारांच्या चौकशीनं आरोपींवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असंही कोर्टानं म्हटलं होतं. त्यामुळंच आज अनिल अंबानी यांना कोर्टात हजर राहावं लागलंय. आता टीना अंबानींबाबत कोर्ट काय निर्णय घेतं, हे पाहावं लागेल.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, August 22, 2013, 12:00


comments powered by Disqus