Last Updated: Saturday, September 14, 2013, 09:40
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली नरेंद्र मोदी यांची भाजपच्या पंतप्रधानपदाचा उमेद्वार म्हणून निवड करण्यात आल्यानं लालकृष्ण अडवाणी यांना समजावण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले. शुक्रवारी झालेल्या संसदीय बोर्डाच्या बैठकीतही ते अनुपस्थित राहिले. पण, त्यांची आपली उघड उघड अनुपस्थिती सगळ्यांच्याच डोळ्यात भरणारीच होती.
शुक्रवारी संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत बैठकीत अडवाणी सहभागी होणार असंच सांगितलं जात होतं. अडवाणींची नाराजी दूर करण्यासाठी स्वतः नरेंद्र मोदी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. भाजप सूत्रांनी तर अडवाणी तयार झालेत, अशा वावड्याही उठवल्या होत्या. अडवाणी घरातून निघाले त्यावेळी तर अनेकांची तशी खात्रीही पटली. पण थोड्याच वेळात त्यांच्या आशा फोल ठरल्या. कारण, घराबाहेर निघाले तर खरं... पण त्यांनी राजनाथ सिंहांना लिहिलेलं एक पत्र दिलं... आणि पुन्हा माघारी फिरले.
अडवाणी यांनी राजनाथ सिंह यांना पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केलीय. अडवाणी पत्रात राजनाथ सिंहांना म्हणतात, ‘आज दुपारी जेव्हा संसदीय बोर्डाच्या बैठकीबाबत सांगण्यासाठी आलात, तेव्हा मी माझ्या मनातली व्यथा तुमच्या कानी घातली होती. तुमच्या काम करण्याच्या पद्धतीबाबतही मी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की, बैठकीत माझे विचार मांडायचे की नाही, याचा निर्णय नंतर घेईन. आता मी न येणंच योग्य ठरेल, असंच दिसतंय’.
या पत्रावरून अडवाणी यांची नाराजी अजूनही संपलेली नाही, हे स्पष्ट दिसतंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, September 14, 2013, 09:33