Last Updated: Sunday, April 28, 2013, 16:27
www.24taas.com, उत्तराखंडयोग गुरू बाबा रामदेव यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊ शकतो, अशी भीती त्यांच्या जवळच्या लोकांनी व्यक्त केली आहे. सरकारमधील भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाबद्दल बाबा रामदेव सतत लढा देत आहेत. त्यामुळे त्यांना बदनाम करण्याचं कारस्थान सरकारतर्फे यापूर्वी केलं गेलं. आता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारत स्वाभिमान ट्रस्टच्या राकेश कुमार यांनी बाबा रामदेव यांच्यावर हल्ला होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. बाबा रामदेव यांना अडकवण्यासाठी सरकारने यापूर्वी त्यांच्यामागे सीबीआय, सीआयडी आणि आयबीला त्यांच्या मागे लावलं. असा आरोप त्यांनी शुक्रवारी आचार्यकुलम येथे उद्घाटनप्रसंगी केला.
बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठामध्ये १५०० खोल्या आहेत. कुठल्याही खोलीमध्ये मद्य अथवा अमली पदार्थ लपवून त्याचा आळ बाबा रामदेव यांच्यावर आणण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. भक्तांच्या गराड्यात असणाऱ्या बाबा रामदेव यांच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो. त्यामुळे बाबा रामदेव यांच्या कार्यकर्त्यांनी सावध राहावं, असं राकेश कुमार म्हणाले.
First Published: Sunday, April 28, 2013, 16:27