24taas.com- Bank cheque Clearance

चेक नाही वटला, तर बँक वठणीवर येणार...

चेक नाही वटला, तर बँक वठणीवर येणार...
www.24taas.com, नवी दिल्ली

बँकेचे व्यवहार म्हटंले की, अनेक वेळेस वेळकाढूपणा केला जातो. मग त्यात महत्त्वाच काम म्हणजे आपल्याला मिळालेला चेक वटला जाणं. मात्र अनेक वेळेस किंवा बँकेने दिलेल्या मुदतीमध्ये चेक क्लीअर होत नाही. आणि त्याच्या त्रास ग्राहकांना सहन करावा लागतो. मात्र आता बँक ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. तुमचा चेक जर उशीराने वटला तर संबंधित बँक तुम्हांला नुकसान भरपाई देईल.

याबाबत एक धोरण आखण्याचेही निर्देश रिझर्व्ह बँकेने देशातील सर्व नोंदणीकृत बँका, ग्रामीण, प्रादेशिक आणि सहकारी बँकांना दिले आहेत. चेक क्लिअरन्समुळे ग्राहकांना भेडसावणार्‍या समस्येकडे बघता आरबीआयने ही अधिसूचना जारी केली आहे.

वेळेवर चेक क्लिअर न झाल्यास ग्राहकांला किती नुकसानभरपाई द्यायची या मुद्दय़ावरही `चेक कलेक्शन धोरणाचे` दिशानिर्देश तयार करण्याची सूचना रिझर्व्ह बँकेने दिली आहे. आरबीआयनुसार, एखाद्या बँकेने चेक क्लिअरिंगमधील विलंबाबत ग्राहकांना मिळणार्‍या व्याजाची निश्चिती केलेली नसेल, तर बँक बचत खात्यावर जितके व्याज देते त्या हिशेबाने ग्राहकांना नुकसानभरपाई द्यावी.

देशातील बहुतेक बँका बचत खात्यावर ग्राहकांना चार टक्के दराने व्याज देतात. दुसरीकडे, काही बँकांचा या खात्यावरील व्याजदर ६ टक्क्यांपर्यंत आहे. चेक वेळेवर क्लिअर झाला नाही तर ग्राहकांना किती टक्के दराने व्याज देतील, याची माहितीही बँकेने ग्राहकांना द्यावी, अशी आरबीआयची अट आहे.

First Published: Wednesday, August 15, 2012, 13:40


comments powered by Disqus