`एटीएम`मध्ये पैसे अडकले तर बँकाही लटकणार!, bank will pay fine if customers money get stuck in ATM ma

`एटीएम`मध्ये पैसे अडकले तर बँकाही लटकणार!

`एटीएम`मध्ये पैसे अडकले तर बँकाही लटकणार!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

तुम्ही एटीएममधून पैसे काढायला गेलात... सगळे सोपस्कार व्यवस्थित पार पाडलेत... खात्यातील रक्कम वजा झाली... पण, हाती पैसे मात्र पडले नाहीत... असं बऱ्याचदा तुमच्याबाबतीतही घडलं असेल ना! पण, यापुढे असं घडलं तर तुम्ही संबंधित बँकांना धडा शिकवू शकता.

होय, रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या आदेशानुसार, एटीएम मशीनच्या बिघाडामुळे ग्राहकांच्या हाती पैसे पडले नाहीत तर त्याचा भुर्दंड बँकेला सहन करावा लागेल. गेल्या काही दिवसांत एटीएम मशीनच्या नादुरुस्तीच्या घटना वाढत आहेत. तक्रार केल्यानंतर काही दिवसांनी खात्यात पैसे परत जमा झाले तरी ग्राहकांना मात्र याचा नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ग्राहकांच्या सोईसाठी निर्माण करण्यात आलेली एटीएमची सुविधाच ग्राहकांच्या गैरसोईसाठी कारणीभूत ठरते.

या घटनांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं गंभीर दखल घेतलीय. अशी घटना घडल्यास तांत्रिक बाबींची पूर्तता करुन सात दिवसांच्या आत ग्राहकाच्या खात्यात पैसे परत करण्याविषयीच्या सूचना बँकांना धाडण्यात आल्यात. एटीएम मशिनमधून पैसे न मिळल्यास संबंधित बँकेच्या हेल्पलाईनवर तक्रार करावी लागते. त्यानुसार सात दिवसांच्या आत पैसे परत करणे बँकेला बंधनकारक असते. परंतु जर, सात दिवसांच्या आत ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर बँकांना आठव्या दिवसापासून रोज दंड भरावा लागणार आहे. तसंच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड इतर व्यवहारातील सुरक्षिततेबाबत अहवाल सादर करण्याची सूचना रिझर्व्ह बँकेच्या महाव्यवस्थापक नीलिमा रामटेके यांनी सर्व बँकांना दिलेल्या आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 9, 2013, 10:15


comments powered by Disqus