विमान प्रवाशांना बोर्डिंग पास मिळणार मोबाइलवर ? , boarding pass on mobile, Plane Birthday Boarding Pass

विमान प्रवाशांना बोर्डिंग पास मिळणार मोबाइलवर ?

विमान प्रवाशांना बोर्डिंग पास  मिळणार मोबाइलवर ?
www.24taas.com,नवी दिल्ली

विमानाचे तिकीट काढल्यानंतर प्रत्यक्ष प्रवासापूर्वी बोर्डिंग पाससाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही. कारण हा बोर्डिंग पास लवकरच तुमच्या मोबाइलवर उपलब्ध होणार आहे.

सुरक्षा तपासणीचा एक भाग म्हणून मोबाइलवरच बार कोडेड बोर्डिंग पास उपलब्ध करून देणारी यंत्रणा विकसित करण्याची सूचना नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने ब्युरो ऑफ सिव्हिल अँव्हिएशन सिक्युरिटीला केली. यामुळे देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांना लवकरच थेट मोबाइलवरच बोर्डिंग पास उपलब्ध होणार आहे.

सध्या विमान तिकिटाच्या हार्ड कॉपीऐवजी मोबाइल फोनवरील ई तिकिटावर प्रवाशांना विमानतळावर प्रवेश दिला जातो. त्यात एक पाऊल पुढे टाकत मोबाइलवर ई बोर्डिंग कार्ड उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांची सोय होण्याबरोबरच यंत्रणांचा तपासणीचा वेळही वाचणार आहे.

विमानतळाच्या सुरक्षेची हाताळणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलातर्फे (सीआयएसएफ) केली जाते. प्रवाशांच्या सामानाची तपासणी करतानाच बोर्डिंग पास तपासणीची कार्यवाही पूर्ण करते. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या काही आठवड्यांत होण्याची अपेक्षा नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

सीआयएसएफने हॅण्डबॅगवर लावलेल्या स्टॅम्पचे टॅग बरेचदा प्रवाशांकडून गहाळ होतात. अशावेळी सुरक्षा जवान त्यांना विमानात सोडत नाहीत. मग सिक्युरिटी काउंटरवरून पुन्हा स्टॅम्प टॅग मिळविण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू होते. ही गैरसोय टाळण्यासाठी सुरक्षा तपासणीची ही पद्धती बंद करण्याची मागणी दिल्ली विमानतळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे केली आहे.

First Published: Tuesday, March 12, 2013, 17:05


comments powered by Disqus