Last Updated: Sunday, March 10, 2013, 13:47
www.24taas.com,बहराइचउत्तर प्रदेशमधील बइराइच जिल्ह्यातील राणीपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ताजपूर गावात शनिवारी धक्कादायक घटना घडली. भावानेच आपल्या सख्या बहिणीची धारधार हत्याराने मान छाटली आणि छाटलेली मान घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले.
ताजपूर गावात जब्बार यांचे कुटुंब राहते. ते अत्यंत गरीब आहेत. जब्बार यांची मुलगी महरून आपले लग्न ५० वर्षीय श्रीमंत व्यक्तीशी करणार होती. मात्र, याला भावाचा विरोध होता. तिचा भाऊ ननके हा महरूनचे लग्न तिच्यापेक्षा लहान असलेल्या एका गरीब मुलाबरोबर करण्याचा विचार करीत होता. तशी त्याची ईच्छा होती, अशी पोलिसांनी माहिती दिली.
भावाचा महरूनच्या लग्नाला विरोध होता. लग्नावरून वाद होत होता. दोन ते तीन दिवस महरून या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र, ती आपल्या मतावर ठाम होती. त्यामुळे दोघांमधील भांडण विकोपाला गेले. त्यातून भावाने तिची हत्या केली असावी, अशी माहिती पोलीस अधीक्षक विजयकुमार यादव यांनी दिली.
महरूनला भावाचा प्रस्ताव मान्य नव्हता. याचा भावाला राग आला. त्यांने कुऱ्हाड घेऊन आपल्या बहिणीची मानच तोडून हत्या केली. छाटलेली मान घेऊन तो थेट पोलीस ठाण्यात गेला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी आणि परिसरातील लोकांनी दिली. पोलिसांनी मृत बहिणीची तोडलेली मान ताब्यात घेतली. तर हत्या करणाऱ्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे.
First Published: Sunday, March 10, 2013, 13:47