Last Updated: Friday, November 23, 2012, 19:47
www.24taas.com, नवी दिल्ली कॅगच्या ज्या अहवालामुळे टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा उजेडात आला, तो अहवालच आता वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. या अहवालात आकडेवारी टाकताना आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप कॅगचे तत्कालिन महासंचालक आर. पी. सिंग यांनी केलाय. याचंच निमित्त करून काँग्रेसनं भाजपाला टार्गेट केलंय.
टू जी स्पेक्ट्रम वाटपात लिलाव न केल्यानं सरकारचं कोट्यवधींचं नुकसान झाल्याचा अहवाल ‘कन्ट्रोलर अॅन्ड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया’ म्हणजेच कॅगनं दिल्यामुळे बराच गदारोळ झाला होता. मात्र, या अहवालावर बळजबरीनं आपली सही घेण्यात आल्याचा आरोप कॅगचे तत्कालिन महासंचालक आर. पी. सिंग यांनी आता केलाय. टू जी प्रकरणी आकडेवारी समोर आणताना लोकलेखा समितीचे अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी दबाव आणल्याचा सिंग यांनी केलाय. मात्र, जोशी यांनी हे आरोप फेटाळून लावलेत.
दरम्यान, कॅगच्या अहवालात अशी काही गफलत झाली असेल, तर ती अत्यंत गंभीर बाब असल्याचं संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी म्हटलंय. सिंग यांनी निवृत्तीनंतर एका वर्षानं फोडलेलं हे बिंग राजकारणाचं साधन बनलं नाही, तरच नवल. या ताज्या आरोपांमुळे काँग्रेस-भाजपा आमने-सामने आलेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही या वादात उडी घेतलीय. कॅग अहवालाबाबत भाजपचा बुरखा फाटला असल्याची टीका त्यांनी केलीय. सिंग यांच्या या खुलाशामुळं कथित टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याबाबतचं सत्य जगासमोर आल्याचं सोनिया यांनी म्हटलंय.
गेल्या आठवड्यात टू जी लिलावास मिळालेला थंडा प्रतिसाद आणि सिंग यांचा गौप्यस्फोट यामुळे इतके दिवस काँग्रेसच्या मानगुटीवर बसलेलं टू जी स्पेक्ट्रमचं भूत आता भाजपालाही पछाडणार, अशीच चिन्हं आहेत.
First Published: Friday, November 23, 2012, 19:47