Last Updated: Wednesday, November 28, 2012, 09:41
www24taas.com, नवी दिल्ली केंद्र सरकरानं कॅश सबसिडी योजना लागू करण्याची घोषणा केलीय. या क्रांतीकारी योजनेमुळं आता थेट लाभार्थींच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळं सरकारच्या विविध योजनांचा थेट लाभ आता लाभार्थींना घेता येणार आहे. यासाठी मात्र लाभार्थींकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे.
सुरूवातीला ही योजना देशातल्या ५१ जिल्ह्यांमध्ये एक जानेवारीपासून प्रायोगिक तत्वावर लागू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या पाच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलाय. सरकारच्या ४२ पैकी २९ योजनांचा लाभ लाभार्थींना मिळणार आहे. यात विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, वृद्ध आणि महिला पेन्शन लाभधारकांना या योजनेचा थेट लाभ घेता येणार आहे. गॅस तसंच रॉकेलचं अनुदानही लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. विशेष म्हणजे अनुदानाची रक्कम काढण्यासाठी लाभार्थींना बँकेत जाण्याची गरज नसून मोबाईल एटीएमद्वारे ही रक्कम लाभार्थींपर्यंत पोहचवली जाणार आहे.
देशासाठी गेम चेंजर ठरणाऱ्या या योजनेचे अनेक फायदे लाभार्थ्यांना होणार आहेत. या योजनेमुळं भष्ट्राचाराला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. पैसे थेट बँक खात्यात जमा होणार असल्यामुळं लाभार्थींना त्याचा थेट फायदा मिळणार आहे. सरकारी यंत्रणांमध्ये सुरू असलेल्या खाबुगिरीलाही चाप बसणार... अनुदान मिळवण्यासाठी संबंधित सरकारी कर्मचाऱ्याला वाटा देण्यापासून लाभार्थींची सुटका होणार आहे. तसंच लाभार्थींच्या अनुदानाची रक्कम परस्पर लाटण्याच्या गैरप्रकारांना आळा बसणार आहे. त्यामुळं सरकारी यंत्रणेतील टक्केवारीची साखळी तुटणार आहे. विशेष म्हणजे रेशनिंगमधला काळा बाजारही रोखण्यास मदत होणार आहे. या योजनेतून लाभार्थी कुटुंबाच्या खात्यात वर्षाला सरासरी ३२ हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेचा देशातील दहा कोटी कुटुंबांना फायदा होणार आहे. ही योजना समाजातला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असली तरी देशातल्या राजकीय समीकरणांवरही परिणामकारक ठरणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
First Published: Wednesday, November 28, 2012, 09:41