Last Updated: Thursday, February 13, 2014, 15:56
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीतेलंगणा विधेयक सादर केल्यानंतर लोकसभेत आज अभूतपूर्व गोंधळ झाला. विधेयकावरून तेलंगणा समर्थक आणि विरोधक खासदारांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणी राजगोपाल या काँग्रेसच्या खासदारांसह १७ खासदारांना निलंबित करण्यात आलंय. या सर्व गोंधळानंतर संसंदेचं कामकाज १७ फेब्रुवारी म्हणजे सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलंय.
या हाणामारीत तीन खासदार जखमी झाले आहेत. तर काँग्रेसचे खासदार राजगोपाल यांनी सभागृहातच मिरची पूड भिरकावली. त्यामुळं अनेक खासदारांच्या डोळ्यांची जळजळ झाली. त्यानंतर टीडीपीचे खासदार वेणूगोपाल यांनीही आक्रमक पवित्रा घेत थेट चाकूच काढल्याची चर्चा आहे. या अभूतपूर्व गोँधळामुळं पुन्हा एकदा संसदेची लाज देशाच्या वेशीवर टांगली गेली.
तेलंगणा मुद्द्यावर आंध्र प्रदेश विभाजनास विरोध करणाऱ्या खासदारांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हातून हे विधेयक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. लोकसभा अध्यक्षांपुढील जागेमध्ये तेलंगणविरोधी आणि समर्थक खासदारांमध्ये झालेल्या जोरदार धुमश्चक्री झाली. यावेळी धक्काबुक्कीदरम्यान एका खासदाराने मिरची पुड असलेला स्प्रे मारल्याने गोंधळाची परिस्थिती उद्भवली.
हा स्प्रे काही खासदारांच्या डोळ्यांत गेल्याने संसदेच्या आवारात रुग्णवाहिका बोलाविण्याची वेळ आली. या स्प्रेमुळे तीन खासदारांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, तेलंगणा राज्य निर्मितीस सीमांध्र भागामधील सर्वपक्षीय खासदारांनी कडवा विरोध दर्शविला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काल संसदेमधील गोंधळ पाहून अत्यंत वेदना होत असल्याचे म्हटले होते. आजही तेलंगणच्या मुद्यावरून लोकसभेमध्ये राडा पाहायला मिळाला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, February 13, 2014, 15:56