Last Updated: Saturday, July 27, 2013, 16:24
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीअन्नाची सुरक्षा देणा-या काँग्रेसकडून गरीबांची थट्टा सुरूच आहे. आता केंद्रीयमंत्री फाऱूख अब्दुल्ला यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. चक्क एक रुपयात जेवण मिळत असल्याचं सांगत अब्दुलांनी गरीबांच्या जखमेवर आणखीनच मीठ चोळलंय. तर चौफेर टीका होत असल्यानं राज बब्बर यांच्या माफी मागण्याची नामुष्की ओढवलीय. काँग्रेसनं मात्र या वादग्रस्त विधानांबाबत हात झटकले आहेत.
काँग्रेस नेते स्वस्त जेवणाच्या दरांवरून अकलेचे तारे तोडत असतानाच युपीएचे केंद्रीयमंत्री असलेल्या फारूख अब्दुल्लांनी यावर कळस चढवलाय. जेवणाचं काय ते एक रुपयातही मिळू शकतं असा अजब दावा अब्दुल्लांनी गरीबांच्या जखमेवर आणखीनंच मीठ चोळण्याचं काम केलंय.
सरकारनं गरीबीची 32 रूपयांची क्रांतीकारी व्याख्या केल्यांनंतर काँग्रेस नेत्यांमध्ये त्याच्या समर्थनासाठी स्पर्धा लागलीय. देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये स्वस्त जेवणाचा जावईशोध घेत गरीबांची क्रुर चेष्टा करण्याचा उपद्व्याप काँग्रेस नेत्यांनी सुरू केलाय. राज बब्बर यांनी तर मुंबईत 12 रुपयांमध्ये कसं जेवण मिळतं याचं फुटपाथवर राहणा-या गरीबालाही लाजवेल असं अफलातून ज्ञान दिलंय.
त्यामुळं आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही रिकाम्या प्लेट्स घेऊन 12 रुपयाच्या जेवणासाठी त्यांच्या घरासमोर ठाण मांडलं. त्यामुळं बब्बर यांच्या अखेर खेद व्यक्त करण्याची नामुष्की ओढवली. तर काँग्रेस नेत्यांच्या या खोडसाळपणाचा समाचार घेण्याचं आयत कोलीत भाजपच्या हातात आलं.
इंदिरा गांधींनी 70 दशकात गरीबी हटावचा नारा दिला होता. पण गरीबीची किंमत त्यांनी कधी लावली नव्हती. काँग्रेस प्रणीत युपीए सरकारनं मात्र गरीबांची किंमत तर ठरवलीच पण त्यांच्या जखमेवर मीठ चोळत त्यांची थट्टाही सुरू केलीय. अन्न सुरक्षा कायद्याच्या बढाया मारणा-या काँग्रेसचं जेवण नको पण चेष्टा थांबवा असं म्हणण्याची वेळ देशातल्या गरीबावर आलीय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, July 27, 2013, 16:24