‘आम आदमी पार्टी’ बनली करोडपती!, crorepati aam aadmi party

‘आम आदमी पार्टी’ बनली करोडपती!

‘आम आदमी पार्टी’ बनली करोडपती!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

अण्णा हजारेंशी फारकत घेऊन राजकारणाच्या माध्यमातून आपली वेगळी वाट निवडणाऱ्या ‘आम आदमी पार्टी’ला मिळणारा लोकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चालल्याचं चित्र दिसतंय. याच प्रतिसादामुळे आम आदमी पार्टी आता करोडपती बनलीय.

होय, आम आदमीनं देणगीसाठी सामान्य जनतेला केलेल्या आवाहनाला जबरदस्त प्रतिसाद मिळालाय. तीन महिन्यांत पक्षाकडे तब्बल दोन कोटींची देणगी जमा झालीय. याबाबतीत ‘आम आदमी पार्टी’ ने अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखालील जनलोकपाल आंदोलनालाही मागं टाकलंय असं दिसतंय. पक्षाला चेकनं पैसे देणाऱ्या देणगीदारांची संख्याही कमी नाहीय. आत्तापर्यंत चेकनं जमा झालेली देणगी ७० लाखांच्या घरात आहे.

ऑनलाईन देणगीदारांनी अगदी ५० रुपयांपासून लाख रुपयापर्यंतची देणगी दिलीय. यात परदेशी भारतीयांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अण्णांच्या जनलोकपालला याआधी चार महिन्यांत अवघे सव्वा कोटी रुपये मिळाले होते. एक परदेशी भारतीय सरासरी १०० डॉलर देणगी पक्षाला देत असल्याचे पक्षामार्फत सांगण्यात आले. ऑनलाईन ट्रॅन्झॅक्शन पार पडल्यानंतर काही वेळातच पक्षाच्या वेबसाईटवर याबद्दलची माहिती उपलब्ध करून दिली.

नोब्हेंबर २०१२ मध्ये पक्ष स्थापनेच्या वेळी शांतीभूषण यांनी पक्षाला एक कोटी रुपयांची देणगी दिली होती. यावेळी ‘दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष सर्वच्या सर्व ७० जागांवर निवडणूक लढवणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार एका उमेदवाराला १४ लाख रुपये खर्च करण्याची परवानगी असते. त्यानुसार आमच्या ७० उमेदवारांसाठी आम्हाला नऊ कोटी आठ लाख रुपये जमा करावे लागणार आहेत’ असं पक्षातर्फे सांगण्यात आलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 29, 2013, 13:25


comments powered by Disqus