Last Updated: Monday, December 31, 2012, 11:19
www.24taas.com,मुंबईकोट्यवधींची उलाढाल असलेल्या टाटा समूहाची धुरा तब्बल दोन दशके यशस्वीपणे संभाळल्यानंतर शुक्रवारी रतन टाटा ७५व्या वाढदिवशी अध्यक्षपदावरून निवृत्त झाले. टाटांची जबाबदारी आजपासून सायरस मिस्त्री हाती घेणार आहेत.
टाटांचे उत्तराधिकारी सायरस मिस्त्री यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने यापुढे टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिस्त्री स्विकारत आहेत. रतन टाटा यांनी गेल्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर त्यांनी टाटा समूहाचा नवा वारसदार म्हणून सायरस मिस्त्री यांची निवडदेखील केली होती.
रतन टाटा निवृत्त झाले. तो दिवस पुण्यातील कामगारांबरोबर घालविला. आम्हाला देव भेटला नाही, मात्र, टाटा भेटले, असे गौरोउद्गार कामगारांनी काढले. रतन टाटा यांनी कामगारांसोबत साधे जेवण घेतले.
जेआरडी टाटा यांच्याकडून २१ वर्षापूर्वी कंपनीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणा-या रतन टाटा यांनी आपल्या कारकीर्दीत टाटा समूहाला जगतिक स्तरावर ओळख मिळवून दिली. पाच दशकांहून अधिक काळ रतन टाटा हे कंपनीचे सदस्य होते. त्यांनी अनेक नवीन क्षेत्रांमध्ये प्रवेश केला. यामुळे टाटा समूहाची उलाढाल झपाट्याने वाढली.
१९७१ मध्ये टाटा समूहाची १०,००० कोटींची उलाढाल होती. तर २०११-१२ च्या अखेरीस उलाढालीचा आकडा ४,७५,७२१ कोटींवर गेला आहे. टाटा समूहाची व्याप्ती केवळ एकाच क्षेत्रापुरती मर्यादित नाही. पोलाद, मोटार, माहिती-तंत्रज्ञान, ग्राहकोपयोगी वस्तू, वित्तीय सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये टाटा समूहाने मोठी मजल मारली आहे. सर्वसामान्यांसाठी ‘नॅनो’ या महत्त्वाकांक्षी मोटारीचे स्वप्न साकार केले.
First Published: Monday, December 31, 2012, 09:46