नागपूरकर गडकरी फडकवणार दिल्लीत भाजपचा झेंडा?Daily Routine of Nitin Gadkari In Delhi Assembly Electio

नागपूरकर गडकरी फडकवणार दिल्लीत भाजपचा झेंडा?

नागपूरकर गडकरी फडकवणार दिल्लीत भाजपचा झेंडा?
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

दिल्ली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपचे नेते नितीन गडकरींवर देण्यात आलीये. नितीन गडकरी सध्या कसा प्रचार करत आहेत, त्यांच्यासमोर काय आव्हानं आहेत, त्यांचा दिनक्रम कसा आहे. हे जाणून घेऊया...

सध्या सकाळी आठ वाजल्यापासूनच नितीन गडकरी यांच्या घरी लगबग सुरु होते. दिल्लीच्या विविध विधानसभा क्षेत्रातल्या प्रचाराची धुरा गडकरींच्या खांद्यावर सोपवण्यात आलीय. कोण कसा प्रचार करतंय, कसा प्रतिसाद आहे? याची माहिती ते घेतात. त्यांचा बाईट घेण्यासाठी प्रसारमाध्यमांचाही गराडा असतोच.

दिल्लीत भाजपला पाठिंबा दिलेल्या वेगवेगळ्या युनियनच्या बैठका घेऊन त्यांच्याशी ते संवाद साधतात. दिल्लीतल्या निवडणुकांचं महत्त्व समजावून सांगतात. या बैठकांमधून भेटायला आलेल्या मित्रमंडळींनाही ते आवर्जून वेळ देतात. शेती, इंधन या क्षेत्रात त्यांनी केलेले प्रयोग सांगतात. दिल्लीतील विधानसभांचा आढावाही ते घेतात. अगदी जेवणासाठीही वेळ नसताना गडकरी जेवणाच्या टेबलवर मनसोक्त गप्पाही मारतात.

त्यानंतर पुन्हा एकदा गडकरींची स्वारी विधानसभांच्या प्रचारासाठी निघते. एका दिवशी नितीन गडकरी दिल्लीत चार रॅली करतात. कधी लक्ष्मीनगर, गांधीनगर, यमुनेच्या पार असलेल्या मतदारसंघांत जास्त वेळ घालवतात.

या भाषणात गडकरी महाराष्ट्रात केलेल्या विकासाचा पाढा वाचून दाखवतात. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे कसा बांधला आणि दिल्लीत यमुनेच्या पुढं विकास कसा आला नाही हे सांगतात. भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि सत्ता बदलणं कसं जरूरीचं आहे, हे ते आपल्या भाषणांमधून सांगतात. युपीए सरकारचा भ्रष्टाचार आणि काँग्रेसमधील घराणेशाहीवर केलेल्या टीकेवर लोकांकडून प्रतिसाद मिळतो. भाजपला विजयी करा असं आवाहन करत पुढच्या रॅलीसाठी ते निघतात.

भाजपासाठी यावेळीची दिल्लीची निवडणुक ‘करो या मरो’ अशीच आहे. तब्बल पंधरा वर्ष काँग्रेसनं इथं राज्य केलंय. या निवडणुकीत महाराष्टातल्या नितीन गडकरींचा खरा कस लागणार आहे. त्यांना किती यश मिळतंय हे आठ डिसेंबरलाच कळेल.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 30, 2013, 19:24


comments powered by Disqus