Last Updated: Tuesday, December 25, 2012, 09:32
www.24taas.com, नवी दिल्ली राजधानी दिल्लीत गेल्या आठवड्यात पॅरा मेडिकलच्या एका तरुणीवर चालत्या बसमध्ये झालेल्या पाशवी सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या विरोधार्थ इंडिया गेटवर आंदोलन सुरूच आहे. गेल्या रविवारी या आंदोलनाला सुरुवातीलाच हिंसक लागलं होतं. या हिंसेदरम्यान जखमी झालेल्या दिल्ली पोलीस दलातील हवालदार सुभाषचंद तोमर यांचा आज सकाळी मृत्यू झालाय.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुभाषचंद तोमर यांनी आज सकाळी ६.४० च्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला. इंडिया गेटवर गँगरेपच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या जनतेला आवरण्यासाठी गेलेले तोमर आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणात गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना राम मनोहर लोहिया हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून ते व्हेटिंलेटरवरच होते. प्रकृती आणखीनच गंभीर झाल्यानंतर ४७ वर्षीय सुभाष चंद यांचा आज सकाळी राम मनोहर लोहिया हॉस्पीटलमध्येच मृत्यू झाला.
तोमर हे मूळचे उत्तर प्रदेशातील मेरठचे रहिवासी होते. त्यांची नियुक्ती करावल नगर भागात झाली होती. रविवारी गँगरेपविरुद्धच्या आंदोलनाला थोपवण्यासाठी त्यांना इंडिया गेटवर बोलवण्यात आलं होतं. टिळख रोडवर ते जखमी अवस्थेत सापडले होते. त्यानंतर तात्काळ त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
First Published: Tuesday, December 25, 2012, 09:16