Last Updated: Thursday, January 30, 2014, 12:57
www.24taas.com, झी मीडिया, रांची बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि चारा घोटाळ्यातील दोषी लालूप्रसाद यादव सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. पण, याच लालूंच्या दिमतीला पोलिसांना रात्रंदिवसा एक करावा लागतोय. एव्हढच नाही तर डीएसपींकडून आपले पाय धुवून घेण्याचीही लालूंची मजल गेलीय.
तीन महिने तुरुंगवास भोगून सध्या जामीनावर असलेल्या लालूंनी जामीन मिळवून बिरसा मुंडा जेलमधून सुटका करून घेतलीय. गेल्या मंगळवारी हेच लालू रामगज जिल्ह्यातील रजरप्पा इथल्या छिन्नमस्तिका मंदिरात देवीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी मंदिरात घुसण्याआधी लालूंनी चक्क ड्युटीवर असणाऱ्या डीएसपपी अशोककुमार यांना आपल्या पायावर पाणी ओतून आपले पाय धुण्याचं फर्मान सोडलं.
डीएसपी अशोककुमार यांनी तातडीने लालूंच्या आदेशाची अंमलबजावणी करत त्यांचे पाय धुतले. त्यानंतर लालूंनी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. यादरम्यान, दुसऱ्या एका पोलीस शिपायानं लालूंची चप्पल हातात घेऊन मंदिराच्या बाहेर त्यांच्या चप्पलांचं रक्षण केलं.
यासंबंधी डीएसपी यांना विचारलं असता, आपण लालूंचे पाय धुतले नाहीत तर केवळ त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिलं, असं त्यांनी उत्तर दिलंय. त्यानंतर सारवासारव करत ‘लालू यादव आणि मी एकाच गावचे आहोत. आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखतो... ते मला मोठ्या भावासारखे आहेत... लहान भावाच्या नात्याने मी त्यांच्या पायावर पाणी टाकले’ असं त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे एका पोलिस शिपायाने लालू यादव मंदिरातून दर्शन घेऊन येत नाही तोपर्यंत त्यांची चप्पल हातात पकडलेली होती.
यावेळी, लालूंसोबत मुलगा तेजस्वी, जावई सौरभ, माजी केंद्रीय मंत्री जयप्रकाश नारायण यादव आणि झारखंडचे प्रदेश महासचिव अमरेश गणक हेदेखील उपस्थित होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 30, 2014, 12:57