‘अन्न सुरक्षे’साठी काँग्रेस खासदारांना व्हीप!, Food Bill: Congress issued a whip to its MPs

‘अन्न सुरक्षे’साठी काँग्रेस खासदारांना व्हीप!

‘अन्न सुरक्षे’साठी काँग्रेस खासदारांना व्हीप!
www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली

काँग्रेसचं आणि मुख्य म्हणजे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं महत्त्वांकाशी विधेयक असलेल्या अन्न सुरक्षा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेतल्या आपल्या खासदारांसाठी काँग्रेसनं व्हीप जारी केलाय. संसदेत हजर राहणं आणि मतदान करण्यासंबंधीचा हा व्हीप आहे.

लोकसभेत काल विधेयकावर चर्चा सुरू झाली. मात्र स्वतंत्र तेलंगणाच्या मुद्यावर तेलगु देसम पक्षानं केलेल्या गोंधळामुळं चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळं आज तरी विधेयकावर चर्चा होते का हे बघावं लागेल. त्यासाठी स्वत: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज लोकसभेत चर्चेला सुरुवात करण्याची शक्यता आहे.

संसदेतल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी संसदेत पहिल्यांदाच संबोधित करतायेत असं नाही. याआधी १३ में २०१२मध्ये संसदेच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या विशेष चर्चेतही सोनिया गांधी सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान, काल सर्वपक्षीय बैठक बोलावून सरकारनं राजकीयदृष्ट्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांसोबतच अन्नसुरक्षा विधेयकावर सहमती घडवून आणली. परंतु, भाजपनं उपस्थित केलेलं रॉबर्ट वद्रा प्रकरण आणि त्यानंतर तेलगू देसमच्या खासदारांनी लोकसभेचं कामकाज वेठीस धरल्यानं काल हे विधेयक बारगळलं.

लोकसभेत प्रचंड गोंधळामुळं तब्बल पाच वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. गोंधळाचा फटका अन्नसुरक्षा विधेयकाला बसत असल्यानं हा तिढा सोडविण्यासाठी कमलनाथ यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, August 14, 2013, 08:36


comments powered by Disqus