आता महाराष्ट्रातील रेल्वे समस्या मार्गी?, Forum will solve the problem - Prime Minister

आता महाराष्ट्रातील रेल्वे समस्या मार्गी?

आता महाराष्ट्रातील रेल्वे समस्या मार्गी?
www.24taas.com, नवी दिल्ली

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत फेरविचार व्हावा यासाठी शुक्रवारी सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन समस्या दूर करण्याची विनंती केलीय. यावेळी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

लोकसभेत अलिकडेच मांडण्यात आलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर दुर्लक्ष झाले असून राज्यातील रेल्वे प्रकल्पांविषयी फेरविचार करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान डॉ. सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटीनंतर पंतप्रधानांनी रेल्वे अर्थसंकल्पात दुर्लक्ष झालेल्या महाराष्ट्रातील प्रकल्पांना मार्गी लावण्याच्या मुद्यावर रेल्वे मंत्री पवनकुमार बंसल आणि रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्याचे निर्देश दिलेत.

या भेटीत रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आणूण दिले. तसेच या दृष्टीने पाऊले उचलत रेल्वे अर्थसंकल्प पारित होण्यापूर्वी या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना योग्य न्याय मिळावा, अशी मागणी केली. यावेळी प्रत्येक खासदारांनी आपआपल्या मतदार संघातील रेल्वे विषयक प्रश्न मांडले. रेल्वेला सर्वात जास्त महसूल महाराष्ट्रातूनच मिळतो तेव्हा या राज्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, अशा भावनाही यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी पंतप्रधानांपुढे व्यक्त केल्या.

या आधी २७ फेब्रुवारीला सर्व पक्षीय खासदारांनी महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वे प्रकल्पविषयक विविध मागण्यासाठी रेल्वे मंत्री पवनकुमार बन्सल यांची भेट घेतली होती. शिष्टमंडळात केंद्रीय कृषी राज्यमंत्री तारिक अन्वर, सुप्रिया सुळे, डी.पी.त्रिपाठी, समीर भुजबळ, ए.टी.नाना पाटील, हरिभाऊ जावळे, हरिश्चंद्र चव्हाण, संजय धोत्रे, हंसराज अहीर, दत्ता मेघे, संजीव नाईक, संजय दिना पाटील, भावना गवळी, भाऊसाहेब वाकचौरे, गणेश दुधगांवकर, हुसेन दलवाई, वंदना चव्हाण, आनंद परांजपे, उदयनराजे भोसले, पद्मसिंह पाटिल, मारोतराव कोवासे, सुभाष वानखडे, चंद्रकांत खैरे आदी खासदार उपस्थित होते.

First Published: Monday, March 4, 2013, 10:01


comments powered by Disqus