सरकारची मुस्कटदाबी, संघासह २० खाती बंद!, Govt. blocks RSS`s twitter Accounts

सरकारची मुस्कटदाबी, संघासह २० खाती बंद!

सरकारची मुस्कटदाबी, संघासह २० खाती बंद!
www.24taas.com, नवी दिल्ली

सरकारने राष्ट्राच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत ट्विटरवरील २० खाती बंद केली आहेत. पूर्वोत्तर राज्यांतील नागरिकांच्या विरुद्ध पसरणाऱ्या अफवा रोखण्याच्या नावाखाली सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र पांचजन्य, प्रविण तोगडीया आणि नरेंद्र मोदींचंही अकाऊंट ब्लॉक केलं आहे.

फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट बंद करण्याच्या नादात सरकारने आपलेच मंत्री मिलिंद देवरा यांचंही अकाऊंट ब्लॉक केलंय. मिलिंद देवरा केंद्रातील संचार आणि प्रौद्योगिक मंत्री आहेत. अर्थात देवरांचं अकाऊंट काँग्रेस सरकारने बंद केलं की ट्विटरनेच ब्लॉक केलंय हे अजून स्पष्ट झालेलं नाही. याआधी आसाम प्रकरणावरून शिव अरूर आणि कांचन गुप्ता या पत्रकारांचीही अकाऊंट ब्लॉक करण्यात आली. अल् जझीराचंही ट्विटर अकाऊंटही ट्विटरने ब्लॉक केलंय.

दूरसंचार मंत्रालयाने १८ ते २१ ऑगस्टदरम्यान हा निर्णय घेतलाय. या कारवाईवर स्पष्टीकरण देताना दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी ट्विटरच्या सर्व्हरवर खापर फोडलं आहे. फेसबूक आणि ट्विटर भारत सरकारला सहकार्य करण्यास तयार झाले असले, तरी अद्याप सगळ्या स्टेक होल्डर्सशी यासंदर्भात बोलणी होणं बाकी आहे, असं सिब्बल यांनी सांगितलं.

गुरूवारी सूचना मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की ट्विटरवरील २८ खाती ताबडतोब बंद करावी लागतील. मात्र ट्विटरने अजून यासंदर्भात कुठलीही माहिती दिली नाही. पंतप्रधानांच्या नावाचीही ट्विटरवर ६ बनावट खाती असल्याचं उघड झालं होतं. सरकारी अधिकाऱ्यांनी कुठलीही गोपनीय माहिती या खात्यांवर प्रकाशित करू नये, अशी माहिती सरकारने दिली आहे. यासाठी ३८ पानांची मार्गदर्शक पुस्तिकाच छापण्यात आली आहे.

First Published: Friday, August 24, 2012, 17:47


comments powered by Disqus