`रक्ताच्या होळी`चा हिजबुलचा डाव उधळला!, Hizbul terrorist held; arms, ammo seized in Delhi

`रक्ताच्या होळी`चा हिजबुलचा डाव उधळला!

`रक्ताच्या होळी`चा हिजबुलचा डाव उधळला!
www.24taas.com, नवी दिल्ली

दिल्लीत घातपात घडवून आणण्याचा अतिरेक्यांचा कट उधळण्यात आलाय. दिल्लीच्या एका गेस्ट हाऊसमधून स्फोटकांचा भला मोठा साठा आणि शस्त्र जप्त करण्यात आलाय. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं ही कारवाई केलीय. होळीच्या अगोदरच दिल्लीत ‘रक्ताची होळी’ खेळण्याचा दहशतवाद्यांचा डाव पोलिसांनी हाणून पाडलाय.

‘हिजबुल’ या दहशतवादी संस्थेशी संबंधित लियाकत अली या अतिरेक्याच्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. लियाकत अलीला दोन दिवसांपूर्वी गाझियाबादच्या गोरखपूरमधून अटक करण्यात आली होती. पोलिसांवर हल्ला करण्याचा डाव दहशतवाद्यांनी आखला होता. दिल्लीच्या जामा मशिदीच्या जवळच असलेल्या अराफत गेस्ट हाऊसवर ही कारवाई करण्यात आली. गेस्ट हाऊसमधून एक ‘एके ४७’ ही जप्त करण्यात आलीय. या प्रकरणी गेस्ट हाऊसच्या दोन कर्मचाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कारवाईनंतर पोलिसांनी गेस्ट हाऊसला सील केलंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, गेस्ट हाऊसमधून पकडण्यात आलेले दोन्हीही आरोपी काश्मिरी दहशतवादी आहेत. हे दोघेही पीओकेवरून नेपाळच्या रस्त्यानं दिल्लीत दाखल झाले होते. श्रीनगरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर झालेल्या हल्ल्यानंतर दिल्ली पोलिसही सावधान झाले होते. दहशतवाद्यांचा होळीच्या आधीच हल्ले घडवून आणण्याचा डाव उधळल्याचा दावा, दिल्ली पोलिसांनी केलाय.

First Published: Friday, March 22, 2013, 12:04


comments powered by Disqus