कर्नाटकात काय होणार, कौल कुणाला?, Karnataka poll: election, counting

कर्नाटकात काय होणार, कौल कुणाला?

कर्नाटकात काय होणार, कौल कुणाला?
www.24taas.com, झी मीडिया, बंगळुरू

कर्नाटक राज्याची सूत्रे कोणाच्या हाती जाणार याचा फैसला आज होत आहे. लोकसभेच्या तोंडावर काँग्रेस आणि भाजप या राष्ट्रीय पक्षांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. कर्नाटकातील निकालाचा लोकसभा निवडणुकीवर प्रभाव पडू शकतो काय, हासुद्धा मुद्दा आहे.

कौल काँग्रेस आघाडीला

मतदानपूर्व जनमत चाचण्यात काँग्रेसच्या बाजूने वातावरण असल्याचा दावा केला जात आहे. द वीक आणि सीएनएन, आयबीएनच्या चाचणीत काँग्रेसला ११७ ते ११९ जागा, तर भाजप ४० ते ६०, जेडीएस ३० ते ४० आणि केजेपी १० ते १५ जागा मिळतील असा अंदाज आहे.

मराठी आवाज

बेळगाव या सीमावर्र्ती भागात महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये या वेळी एकी झाल्यामुळे किमान ३ ते ५ जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभेत पुन्हा एकदा मराठी आवाज घुमू शकतो. गतवेळी फाटाफुटीमुळे एकीकरण समितीला एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता.

कौल कोणाला

कर्नाटकात एकूण २२४ जागा असून बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११३ जागा मिळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. काँग्रेस, भारतीय जनता पक्षासह सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात विकासाकामाऐवजी एकमेकांचा भ्रष्टाचार दाखवण्यातच आपली शक्ती वाया घालवली. त्यामुळे मतदार सत्तेचा कौल कोणाला देणार याविषयी संभ्रम आहे.

कर्नाटक राज्याची विभागणी उत्तर, दक्षिण, मध्य आणि किनारपट्टी अशी चार विभागांत होते. या चारही विभागांत वेगवेगळ्या जातींचे आणि पक्षांचे प्राबल्य आहे. येथील राजकीय गणितेही जातीपातींवर आधारित आहेत. कर्नाटक राज्याच्या राजकारणात लिंगायत समाजाचे मोठे वर्चस्व आहे. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी ३४ टक्के लोकसंख्या ही लिंगायत समाजाची आहे.
कर्नाटकात काय होणार, कौल कुणाला?

येडियुरप्पांची वेगळी चूल

विद्यमान मुख्यमंत्री जगदीश शेट्टार आणि भाजपला दक्षिणेत पहिल्यांदाच सत्ता मिळवून देणारे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा हे लिंगायत समाजातील प्रभावशाली नेते आहेत. उत्तर कर्नाटक हा लिंगायत समाजाचा गड आहे. २००८ च्या निवडणुकीत धारवाड, गदग, दावणगिरी, हावेरी, बागलकोट जिल्ह्यात भाजपला चांगले यश मिळाले होते. येथे येडियुरप्पांच्या प्रभावामुळे भाजपला पहिल्यांदा सत्ता स्थापनेची संधी मिळाली होती. आता मात्र कर्नाटकात चित्र वेगळे आहे. येडियुरप्पा यांनी आपली वेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे भाजपकडे सत्ता जाणार का, याबाबत संभ्रम आहे.

दक्षिण कर्नाटकात वक्कलिंग समाजाची भूमिकासुद्धा निर्णायक असते. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि सुपुत्र माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी हे येथील दक्षिण कर्नाटकातील प्रभावशाली नेतृत्त्व आहे. साहजिकच हा पट्टा जनता दल (सेक्युलर)चा हा बालेकिल्ला. दक्षिण कर्नाटकाच्या जोरावरच कुमारस्वामींचे राजकारण चालते. कारवार, मंगळूर, उडपी जिल्ह्यात माजी परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अनंतकुमार यांचे प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांचेही महत्व या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

बी.एस. येडियुरप्पा यांच्यामुळेच भाजपला कर्नाटकात सत्ता स्थापनेची संधी मिळाली, परंतु त्याच येदियुरप्पांमुळे भाजप सरकार अडचणीत आले. त्याच्या काळात झालेल्या जमीन आणि खाण घोटाळ्यांमुळे भाजपची प्रतिमा मलिन झाली. परिणामी त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. याचाच भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजपला ७५ ते ८० जागांवर समाधान मानावे लागण्याचा अंदाज आहे. येडियुरप्पा यांच्या केजेपीमुळे उत्तर कर्नाटकात अनेक ठिकाणी भाजपला फटके बसण्याची शक्यता आहे.

First Published: Wednesday, May 8, 2013, 09:19


comments powered by Disqus